हॅलो महाराष्ट्र । सोनिया गांधी यांचा तीन पक्षांच्या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. मात्र, सरकार स्थापन करत असताना आम्ही घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले,”संविधानाच्या चौकटीतच सरकार चाललं पाहिजे. संविधानाच्या चौकटीबाहेर बाहेर जायचं नाही आणि तसं झालं तर सरकारमधून बाहेर पडायचं, अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली होती. याबाबत संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाहीत. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतली. तसं त्यांनी लिहून दिलं असल्यानेच सरकार स्थापन झालं,” असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. सरकार सत्तेत आल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधान करणे सुरू आहेत.
हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजेत!
”राजकारण, चित्रपट-नाटक क्षेत्र जवळपास सारखेच आहेत. आमचं क्षेत्र असो वा सिनेमा, नाट्य क्षेत्र सारखचं असतं. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा आहे. सुदैवाने आमचा सिनेमा सध्या बरा चालला आहे. आम्ही एकत्र येऊ असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण हल्ली मल्टिस्टारर सिनेमाचा जमाना आहे. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत. त्यामुळेचं आमचं सरकार आलं,” असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.