महाविकास आघाडीच्या महामोर्चाला अशोक चव्हाणांची दांडी; कारणही सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी कडून आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद या कारणांमुळे महाविकास आघाडी कडून मोर्चा पुकारण्यात आला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच दिग्गज नेतेमंडळी या मोर्चात सहभागी होणार आहेत. परंतु काँग्रेस नेते अशोक चव्हाण मात्र या महामोर्चाला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे चर्चाना उधाण आलं होत, मात्र त्यांनी ट्विट करत आपल्या अनुपस्थितीचे कारण सांगितलं आणि आपली भूमिका स्पष्ट केली.

अशोक चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येेथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार सौ. अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे काँग्रेस मध्ये नाराज असल्याची चर्चा होती. गणपतीच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झाल्याचीही चर्चा होती. परंतु दोन्ही नेत्यांनी ही भेट नाकारली. तसंच शिवसेनेतल्या बंडाच्या काळात काँग्रेसही फुटणार अशी चर्चा सुरू होती, त्यावेळी सुद्धा अशोक चव्हाण यांच्याच नावाची चर्चा रंगली होती. मात्र आपण काँग्रेस मध्येच राहणार आहोत असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.