कराड | अशोकराज उद्योग समूहाने व्यावसायिक भरारीसोबत सामाजिक कार्यातही आपला वेगळा ठसा उमठवला आहे. उन्हाळ्यात पाणी हे अत्यंत आवश्यक अशी गोष्ट असते. त्यामुळे अशोकराज उद्योग समुहाकडून साकुर्डी पेठ येथे मुख्य ठिकाणी पाणपोई उभारल्याने लोकांना त्याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
साकुर्डी पेठ (ता. कराड) येथे अशोकराज चॅरिटेबल ट्रस्टने उभारलेल्या पाणपोई उदघाटनच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, अशोकराज उद्योग समूहाचे संस्थापक, अध्यक्ष शरद चव्हाण, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष हणमंतराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील, म्होप्रे सरपंच तुकाराम डुबल, वस्ती साकुर्डीचे उपसरपंच विश्वास कणसे, आबईचीवाडीचे उपसरपंच अशोकराव माने, सुहास गायकवाड आदी उपस्थित होते.
शंभूराज देसाई म्हणाले, अशोकराज उद्योग समूहाने अत्यंत चांगली भरारी घेतली आहे. त्यासोबत अशोकराज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्यात व समाजातील लोकांसाठी कार्य करण्याचा उपक्रम काैतुकास्पद आहे. विश्वास कणसे यांनी सूत्रसंचालन केले. शरद चव्हाण यांनी आभार मानले.