हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचं रान तापवणारे मनोज जरांगे पाटील बीड मधल्या ज्या मतदारसंघातून येतात तो हाच आष्टी विधानसभा मतदारसंघ… मुंडे कुटुंबावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या आष्टीत यंदा मात्र जरांगे इफेक्ट पाहायला मिळाला आणि मुंडेंच्या पारड्यात आष्टीनं तोडकं मोडकं लीड दिलं… स्टँडिंग आमदार बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे, सुरेश धस अशा राजकारणातील या मुरलेल्या नेत्यांनी महायुतीचं काम केलं खरं… पण आष्टीनं या राजकारण्यांचं न ऐकता जरांगेंच्या बाजूने कौल दिला… येणाऱ्या विधानसभेला आष्टी मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची? एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी अन् राजकीय विरोधक महायुतीच्या एकाच ताटात आल्याने उमेदवारी कोणाला द्यायची? याचा मोठा सस्पेन्स असणार आहेच… पण जरांगेंनीही आष्टीतून आपला उमेदवार रिंगणात दिसेल, याचे संकेत दिलेत… त्यामुळे आजबे, धस, धोंडे या बड्या राजकारण्यांना पुरून उरेल, असा तगडा उमेदवार जरांगे पाटलांना मिळेल का? महाविकास आघाडीकडून नव्या चेहर्याला संधी दिली जाईल की, महायुतीतून एकाचं इनकमिंग करत त्याच्या पाठीशी ताकद देण्याचा पवार डाव टाकतील? महायुतीत कट टू कट स्पर्धेत तिकीट मिळवण्यात कुणाला यश येईल? इथपासून ते आष्टीच्या आमदारकीचा गुलाल कुणाच्या अंगाला लागेल? याच सगळ्या प्रश्नांची ग्राउंड वरची उत्तर जाणून घेऊया
सुरेश धस, बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे तीनही नेते महायुतीमध्ये आहेत. बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार… तर सुरेश धस यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ नुकताच संपलाय…. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून भीमराव धोंडे यांनी तिकीट आपल्या पदरात पाडून घेतलं होतं… परंतु त्यांचा पराभव झाला… आणि तो केला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी… पण एकमेकांच्या विरोधात राजकारण करून मोठे झालेले हे तिन्ही मंडळी सध्या महायुतीच्या एका छताखाली असल्याने तिकीट कुणाला मिळणार? याचा मोठा सस्पेन्स सध्या आष्टी मध्ये दिसतोय…
तसं पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातला सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या आष्टीत आष्टी – पाटोदा – शिरूर असे एकूण तीन तालुके येतात… राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा हा पारंपारिक बालेकिल्ला समजला जायचा… 2009 ला त्यांनी भाजपच्या बाळासाहेब आजबे यांना पराभवची धूळ चारत आमदारकी आपल्याजवळ ठेवली… खरंतर कायम सत्तेत असल्याने आणि राजकीय पद उपभोगणारे धस यांचं नाव जिल्ह्याच्या राजकारणात आदराने घेतलं जायचं… पण 2014 ला सुरेश धस यांना एका मागून एक धक्के बसले… 2014 ला लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी गोपीनाथ मुंडेंना टक्कर दिली.. त्यात त्यांचा दीड लाखाने पराभव झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला.. पण मोदी लाट, लोकसभेतील पराभवामुळे डॅमेज झालेली इमेज, युती आणि आघाडी वेगवेगळ्या लढल्याने झालेलं मत विभाजन भाजपच्या पथ्यावर पडलं आणि सुरेश धस यांच्या राजकारणाचा वारू आमदारकीलाही मागे पडून भाजपचे भीमराव धोंडे आमदार झाले..
पण 2019 येईपर्यंत आष्टीतील राजकारण बऱ्याच पातळ्यांवर बदललं… धनंजय मुंडे हे जिल्ह्यात कुणाचं चालून देत नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचा हा मोठा असामी भाजपात आला.. अर्थात त्यांच्या राजकारणाला योग्य न्याय देण्यासाठी भाजपने त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावली… आमदार होण्याचं स्वप्न काहीही केल्या पूर्ण करण्यासाठी राजकारणात तग धरून राहिलेल्या भाजपच्या बाळासाहेब आजबेंसाठी हा मोठा धक्का होता… म्हणून लांबच राजकारण पाहून आजबे हे भाजपमधून राष्ट्रवादीत आले.. आणि आष्टी विधानसभेचं तिकीटही पदरात पाडून घेतलं… दुसरीकडे भाजपकडून सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांच्या नावासाठी बरीच लॉबिंग झाली, पण शेवटी स्टँडिंग आमदार भीमराव धोंडे यांच्याच नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला… त्यामुळे 2019 ला राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, युती विरुद्ध आघाडी, भीमराव धोंडे विरुद्ध बाळासाहेब आजबे अशी घासून लढत झाली… खरंतर तेव्हाच्या लोकसभेला प्रीतम मुंडे यांच्या पारड्यात आष्टी विधानसभेनं तब्बल 70 हजारांचं लीड दिल होतं… त्यामुळे भाजपचाच उमेदवार म्हणजेच धोंडे आरामात जिंकतील, असा कयास बांधला जात असताना मैदान मारलं ते राष्ट्रवादीच्या बाळासाहेब आजबेंनी… त्यांच्या राजकारणातील पराभवाचा डाग पुसला गेला, आणि पहिल्यांदाच आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडली…
पण हेच आमदार साहेब आजबे राष्ट्रवादीच्या फुटीत अजित दादांसोबत महायुतीत आल्याने आजबे प्लस धोंडे प्लस धस अशा तिघांना आता उमेदवारी मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे… ज्याचा आमदार त्याला तिकीट… असं फॉर्मुला वापरला तर बाळासाहेब आजबे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो… पण मतदारसंघात सुरेश धस हे एक मोठं प्रस्थ आहे… त्यांच्या विधान परिषदेचा कार्यकाळही नुकताच संपलाय… त्यात लोकसभा निवडणुकीत बुथ कमिटी, सरपंच मीटिंग, कार्यकर्त्यांचा कनेक्ट या सगळ्या पातळ्यांवर सुरेश धस यांनी आघाडी घेतली होती… म्हणूनच लोकसभेला कोणी काम केलं? याचा फिल्टर लावला तर सुरेश धस यांच्याच नावाचा प्राधान्य क्रमाने महायुती विचार करू शकते… मराठा आरक्षणाचा बीड विधानसभेतही महायुतीला फटका बसल्याने मराठा चेहरा म्हणूनही धस यांच्या नावाला भाजपकडून ग्रीन सिग्नल दिला जाऊ शकतो… जर असं झालं तर इथे बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे नेमका काय पॉलिटिकल स्टॅन्ड घेणार ते पाहणंही इंटरेस्टिंग ठरणार आहे…
पण जरांगे इफेक्ट प्रभावी राहिल्याने आष्टीमध्ये भाजपचे लीड गेल्या लोकसभेच्या तुलनेने डायरेक्ट निम्म्यावर आलं आहे… अर्थात यांचं नीट डीकोडींग केलं, तर ही गोष्ट महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडू शकते… मेहबूब शेख, साहेबराव दरेकर यांची नावं सध्या मविआच्या उमेदवारीसाठी फ्रंटला आहेत… आष्टीमध्ये सर्वाधिक मतदान हे मराठा समाजाचे आहे. त्या खालोखाल ओबीसी समाजाचे मतदान आहे. यात वंजारी समाजाचे मतदान हे निर्णायक असत. या मतदारसंघातील वंजारी समाजावर पंकजा मुंडे यांचा मोठा प्रभाव कायमच राहिलाय… त्यामुळे आष्टीचा उमेदवारीचा तिढा सुटल्यानंतरच इथल्या निकालाबाबत सध्या आपल्याला क्लियर कट अंदाज येऊ शकतो… पण यात तिकीट कुणाला मिळतं? नाराज कोण होतो? बंडखोरी कोण करतं? जरांगे भूमिका काय घेतात? आणि ओबीसी बांधव कुणाच्या पाठीशी उभा राहतो? या सगळ्या समीकरणांची बेरीज ज्याला पक्की जमली, तोच आष्टी विधानसभेचा पुढचा आमदार होणार, एवढं मात्र नक्की…