जकार्ता | आशियाई स्पर्धेच्या १० व्या दिवशी भारताने दिमाखदार कामगिरी केली. तिरंदाजीमध्ये महिला व पुरुषांच्या संघाने रौप्यपदकाची कमाई केली. टेबल टेनिसमध्ये भारताने पहिल्यांदाच पदकाची कमाई केली. जपानकडून पराभव झाल्याने भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अॅथलेटिक्स मध्ये ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मनजितसिंग याने सुवर्णपदकाची कमाई केली तर याच स्पर्धेत जिन्सन जॉन्सन याने रौप्यपदक मिळवले.
हॉकीमध्येही भारताने श्रीलंकेचा २०-० ने दारुण पराभव करत पुढील फेरीत धडक मारली. अॅथलेटिक्स मध्येच सुरुवात चुकीची झाल्याने हिमा दासला स्पर्धेबाहेर पडावे लागले. द्युती चंदने मात्र २०० मीटर स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. पी.व्ही.सिंधू बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्याने आणखी एका सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. यावर्षी झालेल्या पाचही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तरीही तिने मिळवलेले यश हे प्रत्येक भारतीयाला प्रेरणादायी असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्यक्त केली. आजच्या दिवसात भारताने १ सुवर्ण, ४ रौप्य व १ कांस्यपदकाची कमाई केली.