पाकिस्तानवरून मुख्यमंत्री कार्यालयाला हल्ल्याची धमकी; मुंबई पोलिस यंत्रणा सतर्क

0
2
threat news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबईतील (Mumbai) मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देण्यात येणार आहे. याप्रकरणामुळे मुंबई वाहतूक पोलिस (Mumbai Traffic Police) आणि सुरक्षा यंत्रणा (Security System) अलर्ट मोडवर गेली आहे. ही हल्ला करण्याची धमकी एका पाकिस्तानी क्रमांकावरून व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्यात आली आहे. यानंतर वरळी पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिस यंत्रणा सतर्क

बुधवारी दुपारी मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर एक अनोळखी मेसेज आला होता. या संदेशात मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. हा संदेश पाहताच पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी त्वरित मेसेज पाठवणाऱ्या क्रमांकाचा तपास सुरू केला. पुढे तपासात तो पाकिस्तानमधील असल्याचे आढळले.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनूसार, हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने आपले नाव “मालिक शहाबाज हुमायून राजा देव” असे सांगितले आहे. मात्र, हे नाव खरे आहे की खोटे, याचा तपास सुरू आहे. तसेच, हा संदेश कोणी आणि का पाठवला याचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र एटीएस, सायबर सेल आणि गुन्हे अन्वेषण विभागाने एकत्रित तपास सुरू केला आहे.

या धमकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या शासकीय ठिकाणी सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच, मंत्रालयाच्या प्रवेशद्वारांवर अधिक कडेकोट तपासणी केली जात आहे.

दरम्यान, धमकीचा संदेश पाकिस्तानमधील क्रमांकावरून आला असल्याने सायबर पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांनी याबाबत सखोल तपास सुरू केला आहे. संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचा खरा उद्देश काय, तो कुठून पाठवला गेला आणि त्यामागे कोणते संघटनात्मक हेतू आहेत, याचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ज्ञ तपास करीत आहेत.

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचालींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.