खुन्नसीच्या कारणावरून पहाटेच्यावेळी जमावाकडून तलवारीने कुटुंबावर हल्ला : 11 जणांवर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यात किरकोळ कारणांवरून तलवार, कुऱ्हाड आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करून हल्ले केले जात आहेत. अशा हल्ल्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ होत असल्याचे दिसते. कराड तालुक्यातील विरवडे येथे खुन्नस दिल्याच्या कारणावरून जमावाने एका कुटुंबाच्या घरावर हल्ला केल्याची घटना सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. तलवार, कोयता, लाकडी दांडक्यांनी केलेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेप्रकरणी राजाराम विठ्ठल घार्गे (मूळ रा. जयराम स्वामी वडगाव, ता.
खटाव, सध्या रा. दत्तनगर, विरवडे, ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे. श्रीकांत किसन मदने (वय ४०), नागेश विजय मदने (वय ३०), बाळू संजय बंडलकर (वय ३०), अक्षय आनंदा नाटकर (वय २८), दारासिंग भास्कर मदने (वय ३५), गणेश हणमंत मदने (वय- १९), अमित किसन मदने (वय २२), शरद मोहन मदने (वय – ३०), शंकर राम मदने (वय ३०), प्रवीण सुरेश मदने (वय – २२) व चंद्रकांत बबन बोडरे (वय २५, सर्व रा. विरवडे, ता. कराड) या 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे, तर राजाराम घार्गे, मुलगा कृष्णराज घार्गे व मुलगी शिवानी घार्गे (रा. दत्तनगर, विरवडे, ता. कराड) हे जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरवडे येथील कृष्णराज हा शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ओगलेवाडी येथे काही कामानिमित्त गेला होता. त्यावेळी चंद्रकांत मदने याने कृष्णराजला खुन्नस देत ‘काय बघतोस तुझा कार्यक्रम करतो,’ असे म्हणून धमकी दिली. त्यानंतर कृष्णराज घरी आल्यानंतर 7.30 वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत मदने यांचा भाऊ श्रीकांत मदने व प्रवीण मदने हे दुचाकीवरून हातात तलवार घेऊन कृष्णराज याला शोधत ओगलेवाडीमध्ये फिरत होते. याची माहिती मिळताच राजाराम घार्गे यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास श्रीकांत मदने व प्रवीण मदने यांनी घार्गे यांच्या घरासमोर येऊन त्यांना शिव्या देऊ लागले.

शनिवार पहाटे साडेसहाच्या सुमारास श्रीकांत मदने, नागेश मदने हे हातात तलवार घेऊन अचानक घार्गे यांच्या घरात शिरले. यावेळी आरडाओरडा झाल्याने वरच्या खोलीत झोपलेले शिवराज व कृष्णराज खाली पळत आले. त्यावेळी नागेश मदने यांनी शिवराजच्या अंगावर तलवारीने वार केला. मात्र, शिवानीने मध्ये घुसून प्लॅस्टिक खुर्ची नागेश मदनेच्या अंगावर मारल्याने तो वार चुकला. यामध्ये शिवानीच्या तोंडावर जखम झाली. यावेळी घराबाहेर उभे असलेले इतर संशयित हातात लाकडी दांडके, कोयता, दगड घेऊन घरात घुसले. ते मारहाण करत असल्याचे लक्षात येताच राजाराम घार्गे व त्यांचे सर्व कुटुंबीय वरच्या मजल्यावर जाऊन बसले.

तरीही जमाव भिंतीवर, दारावर कोयता, तलवारीने वार करत दगड, विटा वरच्या मजल्यावर फेकत होते. या सर्व झटापटीत राजाराम घार्गे, कृष्णराज व शिवानी हे जखमी झाले. यावेळी जमावाने घरावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांना देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आल्याचे पाहून संशयित पळून गेले. याबाबतचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

तो रस्त्यावर तलवार आपटत म्हणाला, मी त्याला तोडणार…

ज्यावेळी श्रीकांत मदने कृष्णराज यांच्या घरी गेला तेव्हा श्रीकांतच्या हातात तलवार होती. तो तलवार रस्त्यावर आपटून कृष्णराज याच्या खांडोळ्या करणार आहे, त्याला तोडणार आहे, असे म्हणत होता. त्यावेळी फोनवरून राजाराम घार्गे यांनी ही बाब पोलिसांना सांगितली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आल्याचे पाहताच संशयित पळून गेले. शनिवार पहाटे साडेसहाच्या सुमारास श्रीकांत मदने, नागेश मदने हे हातात तलवार घेऊन अचानक घार्गे यांच्या घरात शिरले. राजाराम घार्गे यांना शिवीगाळ करत तुझ्या अख्ख्या कुटुंबाला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी हातातील टॉवेलने त्यांनी तो वार चुकविला.