चला झोपेतून तर उठले! अण्णा हजारेंच्या कोर्टात खेचण्याच्या इशाऱ्यावर आव्हाडांनी पुन्हा डिवचलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या चांगलंच जिव्हारी लागल आहे. अण्णा हजारेंनी आव्हाडांना वकिलांचा सल्ला घेऊन मानहाणीचा दावा ठोकण्याचा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे हजारे आणि आव्हाड यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मुख्य म्हणजे, अण्णा हजारेंनी हा इशारा दिल्यानंतर आव्हाडांनी पुन्हा एकदा एका पोस्टच्या माध्यमातून अण्णा हजारेंना डिवचलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारेंच्या विरोधात एक पोस्ट करून म्हटले होते की, ‘ह्या माणसाने या देशाचं वाटोळं केलं.. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही’, या पोस्ट सोबत त्यांनी अण्णा हजारे यांचा फोटो देखील शेअर केला होता. या वक्तव्यावरून गुरुवारी अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर आव्हाडांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर अण्णा हजारे यांच्या विरोधात पोस्ट शेअर केली आहे.

नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, “माझ्या ट्विट नी ह्यांना जाग आली. कोर्टात खेचतो ह्याला म्हणजे मला असे पत्रकारांना म्हणाले. चला झोपेतून तर उठले बघू उद्या पासून जागे राहतात का” आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या पोस्टमुळे या दोघांमधील वाद आणखीन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या या पोस्टनंतर अण्णा हजारे नक्कीच कारवाई करतील असे देखील म्हटले जात आहे.

अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, “ते आम्ही देशाचं वाटोळं केलं असं म्हणत असतील. पण मी केलेल्या कायद्यांचा जनतेला फायदा झाला आहे. माहितीचा अधिकार आज देशाला मिळाला आहे. माझ्या काही आंदोलनांमुळे यांच्या कार्यकर्त्यांचं वाटोळं झालं हे नाकारता येत नाही. यांचे बरेच कार्यकर्ते घरी गेले. ते त्यांना सहन होत नसेल म्हणून काहीतरी कुरापत काढायची आणि बदनामी करायची”