हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आपल्यातील कित्येक नागरिकांचे अयोध्येला जाण्याचे स्वप्न आहे. परंतु आर्थिक कारणांमुळे हे स्वप्न अनेकांचा पूर्ण झालेले नाही. परंतु आता थेट महाराष्ट्र सरकार हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करत आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत (Chief Minister Tirthdarshan Scheme) मुंबई आणि ठाण्यातील ४०० ज्येष्ठ नागरिकांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराचे मोफत दर्शन घेतले आहे. तुम्हाला देखील योजनेतून अयोध्येला जायचे असेल तर अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन पोर्टल किंवा सेतू सुविधा केंद्रात विनामूल्य अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करताना प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी फोटोसह केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
निवडीची प्रक्रिया
प्रत्येक तीर्थस्थळासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जातो. जर अर्जांची संख्या कोट्यापेक्षा जास्त झाली, तर लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. निवड झालेल्या व्यक्तीच्या जोडीदारालाही संधी मिळू शकते. तसेच, ७५ वर्षांवरील नागरिकांना जोडीदार किंवा सहाय्यकासोबत प्रवासाची अनुमती आहे.
दरम्यान, या योजनेअंतर्गत एका टूरसाठी ८०० प्रवासी आवश्यक असतात. यामुळे, मुंबई आणि ठाण्यातील एकूण ४००-४०० ज्येष्ठ नागरिकांची निवड करून अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी विशेष यात्रा आयोजित करण्यात येते. राज्यभरातील अनेक ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेत असून आहे. या योजनेअंतर्गत सरकार प्रवाशांच्या राहण्याची खाण्याची आणि प्रवासाची सोय करत आहे.
महत्वाचे म्हणजे, राज्यातील ६६ स्थानिक आणि ७३ राष्ट्रीय तीर्थक्षेत्रांना ही योजना लागू आहे. मुंबईतील १५ आणि ठाण्यातील २ तीर्थस्थळे यात समाविष्ट आहेत. मात्र या योजनेअंतर्गत एका व्यक्तीस केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेण्याची संधी दिली जाते.