Ayodhya Ram Mandir : नवमीचा मुहूर्त खास ठरणार; रामलल्लाच्या भाळी सूर्य किरणांचा तिलक सजणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ayodhya Ram Mandir) येत्या १७ एप्रिल २०२४ रोजी ‘रामनवमी‘ साजरी केली जाणार आहे. यंदाचे हे वर्ष अत्यंत खास आहे. कारण, तब्बल ५०० वर्षांनंतर प्रभू श्री राम त्यांच्या जन्मभूमीत अर्थात आयोध्येत भव्य दिव्य अशा राम मंदिरात विराजमान झाले आहेत. अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी आहे. जी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र उत्साहाने वातावरण निर्माण झाले आहे. विशेष सांगायचे म्हणजे, या रामनवमी सोहळ्यात रामलल्लाचा तिलक सोहळा पार पडणार आहे. जो पाहण्यासाठी अनेक भाविक मैलो अंतर कापून अयोध्येत दाखल होणार आहेत.

रामलल्लाचा सूर्य तिलक (Ayodhya Ram Mandir)

यंदा अयोध्येतील रामनवमी अगदी खास असणार आहे. सगळीकडे रांगोळ्या, फुलांची सजावट, रोषणाई केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने संपूर्ण अयोध्या नगरी सजणार आहे. या खास दिवशी अभिजात मुहूर्तावर रामल्लाच्या भाळी सूर्याची पहिली किरणे पडतील तेव्हा सूर्य राज तिलक सोहळा पार पडणार आहे. अयोध्येतील मंदिरात शुक्रवारी रामलल्लाच्या सूर्य तिलकाची चाचणी घेण्यात आली. आरशातून सूर्याची किरणे थेट प्रभू श्रीरामाच्या मस्तकावर पडत होती.

सूर्य तिलकाच्या चाचणीचा VIDEO व्हायरल

रामजन्मभूमी ट्रस्टने सांगितल्यानुसार, शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तज्ञ शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत सूर्य तिलकाची चाचणी घेण्यात आली. याचा एक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रामलल्लाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास आरती करत आहेत. (Ayodhya Ram Mandir) दरम्यान, सूर्याची किरणे रामलल्लाच्या कपाळावर पडताना दिसतात आणि अत्यंत विलक्षण असा नजारा दिसून येतो. सूर्याची किरणे प्रभू श्रीरामाचा राजतिलक करत आहेत असे भासते.

रामनवमीला पार पडणार तिलक सोहळा

तज्ञांच्या चाचणीला यश आल्यानंतर रामनवमीला हा तिलक विधी पार पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार, दिनांक १७ एप्रिल २०२४ रोजी रामनवमीनिमित्त दुपारी ठीक १२ वाजता रामलल्लाचे सूर्यतिलक करण्यात येणार आहे.

‘अशी’ तयार केली सूर्यतिलक प्रणाली

सीबीआरआयने ही अद्भुत प्रणाली तयार केली असून तज्ञांनी सांगितले की, ‘ही प्रणाली सूर्याचा मार्ग बदलण्याच्या तत्त्वांवर आधारित आहे. यात रिफ्लेक्टर, २ आरसे, २ लेन्स आणि पितळी पाइपद्वारे सूर्यकिरण मूर्तीच्या मस्तकावर पाडण्यात आले. रामनवमीची तारीख ही चांद्र कॅलेंडरनुसार ठरवली जाते. (Ayodhya Ram Mandir) त्यामुळे तिलक विधी वेळेवर होण्यासाठी सिस्टीममध्ये १९ गिअर्स बसवले आहेत. जे काही सेकंदात आरसा आणि लेन्सवरील किरणांचा वेग बदलतील. ज्यामुळे विधीची वेळ चुकणार नाही.

रामजन्मानिमित्त महिनाभर अयोध्येत तळपला सूर्य

रामजन्मभूमी ट्रस्टचे आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, ‘सूर्यतिलकाचे दृश्य अत्यंत अद्भुत आणि तितकेच आश्चर्यकारक होते. शास्त्रज्ञांनी ज्या प्रकारे प्रयत्न केले ते अतिशय कौतुकास्पद आहे. त्रेतायुगात जेव्हा रामाचा जन्म झाला तेव्हा सूर्यदेव एक महिना अयोध्येत राहिले. त्रेतायुगातील ते दृश्य आता कलियुगातदेखील साकार होताना पाहणे याला भाग्यच म्हणावे लागेल’.

अयोध्या नगरीत जंगी तयारी

रामनवमीच्या पावन क्षणासाठी अयोध्या नगरीत (Ayodhya Ram Mandir) तब्बल ५० लाख भाविक घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी प्रशासनाने शक्य ती सगळी तयारी केली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी निवास आणि भोजन सुविधा करण्यात आली आहे. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी देखील केली आहे. परदेशातून येणाऱ्या भाविकांना १४ दिवस क्वारंटाईन केले जात आहे. तसेच सुरक्षेसाठी पोलीस, लष्करी जवानांची पथके तैनात करण्यात आली आहेत.