अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक केंद्र; 35 हजार कोटींचा मेकओव्हर प्लॅन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रामजन्मभूमी अयोध्येला श्री रामाचे मंदिर (Ayodhya Ram Mandir) व्हावे ही भारतातील हिंदूंची मनस्वी इच्छा होती. भाजपप्रणीत केंद्र सरकारच्या कार्यकाळात अयोध्येच्या राममंदिराला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा सिग्नल दिला आणि आता भव्य असे राम मंदिर उभारले गेले आहे. केंद्र सरकार फक्त राममंदिर उभारणार करत नाही तर अयोध्येची संस्कृती जपत या नगरीचा कायापालट करणार आहे. हिंदूंचे प्रार्थनास्थान असलेल्या श्री रामांची अयोध्यानगरी येत्या 20 वर्षांत कायापालट करीत आहे. हा कायापालट करण्यासाठी व अयोध्यानगरीला ग्लोबल अध्यात्मिक सेंटर अशी ओळख करून देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने समोर ठेवले आहे. यासाठी केंद्र सरकारने 35 हजार कोटी रुपयांचा मेकओव्हर प्लॅन तयार करून तो प्रत्यक्षात आणला जाणार आहे.

रामजन्म भूमी अयोध्यानगरीमध्ये आता राम मंदिर बांधून पूर्ण झाले असून अयोध्येला ग्लोबल ओळख करून देण्याचे ध्येय केंद्र सरकारने मनाशी बाळगले आहे. त्या दृष्टीने अयोध्या नगरीत धार्मिक, नागरी आणि आर्थिक विकास करण्यास सुरुवात झाली आहे. मुलभूत सुविधांसह अयोध्या परिसरात पायाभूत सुविधांची संख्या केंद्र सरकारने वाढवली आहे. अयोध्या शहराला ग्लोबल अध्यात्मिक सिटी बनविण्याच्या दृष्टीने परिसरात सुसज्ज आधुनी पार्किंग व्यवस्था, फूडकोर्ट, ओपन जिम, स्वच्छतागृहांची उभारणी करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे जगभरातील कंपन्या अयोध्येत हॉटेल, रेस्टॉरंट इतर व्यवसाय करण्यास इच्छुक झाले आहेत. अयोध्यानगरीच्या कायापालटात रस्त्यांचे रुंदीकरण व उड्डाण पुलांची आवश्यकता असल्याने त्या दृष्टीने बांधकामे सुरु आहेत. अयोध्येतील राम मंदिरातील श्री रामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना नवीन वर्षात जानेवारी महिन्यात होत आहे. राम मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्ट 2020 रोजी झाले होते. गेल्या 3 वर्षांत अयोध्या शहरातील रस्ते, गल्ल्या यांचे रुंदीकरण व पुनर्रबांधकाम केले आहे.

अयोध्यानगरी हे ग्लोबल सेंटर होणार असून भवितव्यात सर्व देशांतील पर्यटकांची येथे गर्दी होणार असल्याने केंद्र सरकारने या शहराला जागतिक अध्यात्मिक केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. अयोध्या नगरीचा तब्बल 35 हजार कोटी रुपयांचा मेकओव्हर प्लॅन केंद्र सरकारने बनवला आहे. उत्तरप्रदेश सरकार या प्लॅनची अंमलबजावणी करीत आहे. तसेच येत्या 20 ते 23 वर्षांत अयोध्येला जागतिक केंद्र बनविण्याचा केंद्र सरकारचा मानस दिसत आहे. केंद्र सरकारने ‘अयोध्या ब्रॅण्ड’ हा विकासाचा आराखडा हाती घेतला असून यामुळे उत्तरप्रदेशातील अर्थव्यवस्था मजबूत केली जाणार आहे, अशी माहिती आयएएस अधिकारी व प्राधिकरण उपाध्यक्ष विज्ञाल सिंग यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

शरयू नदीच्या तिरावर गुप्तार घाट आहे. या घाटाचे महत्व मोठे असून याच घाटावर प्रभू श्री राम यांनी आपल्या अवतार समाप्तीच्या कालावधीत अखेरचे स्नान केल्याचे म्हटले जाते. त्यामुळे हा घाटाला मोठे पावित्र्य लाभले आहे आणि महत्वही मोठे आहे. गुप्तार घाटावर सुविधायुक्त विकासकामे सुरु आहेत. अयोध्येत राम पथ, भक्ती पथ आणि राम जन्मभूमी मार्गाबरोबरच 30 किलोमीटर लांबीच्या दर्शनी भागात अनेक कामे सुरु झाली आहेत. यात रस्त्याचे बांधकाम, रुंदीकरण, घरे व दुकानांना रंगरंगोटी करणे, त्यावर श्री राम मंदिराची कमान, प्रभू श्री रामाची विविध रुपांतील पेंटीग्ज रंगवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
श्री रामाच्या मंदिराच्या उद्घाटनानिमित्त अयोध्या शहरात 9 मीटर उंचीचे 25 श्री राम स्तंभ उभारले जात आहेत. शरयू नदीवर अनेक घाट आहेत, श्री राम या घाटांच्या मार्गाने शरयू नदीवर स्नान करण्यासाठी जार होते, अशी अख्यायिका होती. या शरयू घाटांच्या मालिकेला ‘राम की पैडी’ असे म्हटले जाते. उत्तरप्रदेशातील सरकारने या घाटांवर जगप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर स्मृती चौक उभारण्याचे काम केले आहे. लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजातील प्रभू रामांची भजने या चौकात ऐकण्याची सोय केली आहे.

शरयू नदीच्या मध्यावर्ती पात्रात सरकार पंचवटी द्विप निर्माण करीत आहे. या द्विपा वर धार्मिक, मनोरंजनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी पर्यटकांना अनुभवण्यास मिळेल. शरयू नदीच्या तिरावर पॅराग्लायडिंग, जेट-स्की, हॉट एअर बलून अशा खेळांचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. जवळपास 75 एकर क्षेत्रात ग्रीन फिल्ड वेदिक सिटी उभारण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा मनोदय आहे. शरयू नदीच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण असणार आहे. त्या वातावरणात उच्चभ्रू लोकांसाठी वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. चौधरी चरणसिंग घाटाजवळ अयोध्या हाट उभारून पर्यटन व्यवसायाला प्राधान्य दिले जाणार आहे. शरयुच्या निसर्गसंपन्न परिसरात आलिशान निवासस्थाने, लक्झरी हॉटेल्स उच्चभ्रू पर्यटकांसाठी उपलब्ध केली जाणार आहेत.

अयोध्या नगरीला प्राचीन कालापासून धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक महत्व आहे. या नगरीची ही ओळख जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी व भारतीय सभ्य नागरी संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी अयोध्येत तशा प्रकारच्या सुविधायुक्त आराखड्यानुसार प्रकल्प बांधणी सुरु आहे. अयोध्येतील सूर्यकुंडाचे महत्व मोठे आहे. सूर्यवंशी घराण्याच्या राजांनी सूर्याची प्रार्थना, पूजा करण्यासाठी सूर्यकुंडाचे प्रयोजन केले होते. अयोध्येतील दर्शननगर भागात हे सूर्यकुंड आहे. आता या परिसराचे सुशोभिकरण व बांधकाम सुरु आहे. पर्यटकांना सुर्यकुंडाचा इतिहास माहित व्हावा या उद्देशाने साउंड अँण्ड लाइट शो सादर करून माहिरी दिली जाणार आहे. पूर्वी अयोध्या नगरीत अरुंद गल्ल्या, रस्ते होते. ही अडचण दूर करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने सुसज्ज रस्ते व गल्ल्यांचे बांधकाम हाती घेतले आहे.