Bacchu Kadu : बच्चू कडूंचा ‘हा’ इतिहास तुम्हाला आजवर कुणीच सांगितला नसेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गरिबांचा रॉबिनहुड, अंध अपंगांचा आधारवड, ज्यांच्या भाषणांनी विधान भवनात सत्ताधाऱ्यांना घाम फुटतो… शेतकऱ्यापासून ते प्रत्येक उपेक्षित घटकासाठी आसूड काढण्याची धमक दाखवून सरकारवर प्रहार करणारे बच्चू कडू… विदर्भातल्या अचलपूरसारख्या एका साध्या मतदारसंघाचे आमदार राहिलेले बच्चू कडू यांचं नाव मात्र उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे… शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले टाईप आंदोलन असो… वा वनाधिकाऱ्यांच्या घरात साप सोडणं… हा माणूस कशालाच भीत नाही… आकडेवारीच्या भाषेत बोलायचं झालं तर इन मीन दोन आमदार असणाऱ्या या प्रहार पक्षाची सर्वच राजकीय पक्षांना धास्ती का वाटते? बच्चू कडू या माणसाच्या राजकारणाचं गणित नेमकं आहे तरी काय? आणि येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्राच्या राजकारणात हे नाव सर्वात फ्रंटला कसं दिसू शकतं? त्याच सगळ्याची साधी सोपी मांडणी पाहुयात… .

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला प्रहार 20 जागांवर निवडणूक लढवेल, अशी घोषणा करून बच्चू कडूंनी आमदारकीचं बिगुल वाजवलं… महाराष्ट्राच्या पॉवर पॉलिटिक्समध्ये तयार झालेला स्पेस भरून काढण्याची मोठी संधी यंदा प्रहारला चालून आली आहे… पण आजकालच्या स्पर्धेमध्ये बच्चू कडू नावाचा ब्रँड बनवणं… आणि राजकारणामध्ये मुरलेल्या, खानदानी आणि प्रस्थापित नेत्यांना भिडण्याचा हा प्रवास वाटतो तितका साधा नक्कीच नव्हता… या सगळ्याची सुरुवात झाली महाराष्ट्राच्या काठावर असणाऱ्या अमरावतीमधील चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा या गावापासून… ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जन्म याच बेलोऱ्याचा…. चक्क आठवीत असताना तरुणांना बरबाद होण्यापासून वाचवण्यासाठी बच्चु भाऊंनी तमाशा बंदीसाठीच आंदोलन केलं होतं… तेव्हा पुऱ्या गावाला त्यांच्यातील डायरेक्ट भिडण्याच्या स्वभावाचा ट्रेलर बघायला मिळाला होता… त्यात पुढे बँकेचे हप्ते थकल्यामुळे ट्रॅक्टर जप्ती झालेल्या हवालदील शेतकऱ्यांसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चामुळे बच्चू कडू हे नाव पंचक्रोशीत चांद्यापासून बांधापर्यंत माहित झालं… खरं म्हणजे प्रहारचा आसूड हातात घेणारे बच्चू भाऊ बाळासाहेबांचे जब्री फॅन म्हणूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेपासून झाली…

YouTube video player

अडलेल्या नडलेल्या साठी धावून जाणाऱ्या याच बच्चु भाऊंना राजकारणात येण्याचा कार्यकर्त्यांनी तगादा लावला… म्हणून त्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती एकामागून एक लढवली… आणि जिंकली देखील… यानंतर त्यांनी लावलेल्या कामांचा सपाटा इतका मोठा होता की बच्चुभाऊ हे नाव पंचक्रोशीत आदरानं घेतलं जाऊ लागलं… इंटरेस्टिंग गोष्ट अशी की स्वतःच्या लग्नात देखील मोठा तामजम न करता गांधी जयंतीच्या दिवशी राष्ट्रभक्तीपर गीतांच्या आवाजात दिव्यांग बांधवांना सायकल वाटप करून बच्चु भाऊंनी लग्नाचा नवा पायंडा पाडला होता… पण शिवसेना पक्षातील असणाऱ्या अंतर्गत कुरघोडींमुळे बच्चूभाऊंनी पक्ष सोडला… आणि प्रस्थापितांच्या नाकावर टिच्चून स्वतंत्र राजकारण करण्याचा निर्णय घेतला…पण ते कसं आणि कुठल्या नावाखाली करायचं? हा मोठा प्रश्न होता…

याच दरम्यान एकदा बच्चूभाऊ टीव्हीवरती नाना पाटेकरांचा प्रहार हा सिनेमा बघत होते… भ्रष्टाचाराच्या प्रश्नांना या चित्रपटातून नायक भिडत असतो… पण खऱ्या खुऱ्या आयुष्यात बच्चुभाऊ हे पात्र अक्षरशः जगत होते…त्यांनी लगेच कार्यकर्त्यांना बोलावून घोषणा केली… अपंग बांधव, रुग्ण, शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी राजकारण करण हे आपलं काम आहे, आणि यासाठी आता आपल्याला कोणताही अडथळा नको आहे… त्यामुळे आता आपण अपक्ष… आपली संघटना ‘प्रहार संघटना’… या घोषणेपासून ते आजपर्यंत प्रहारची चळवळ एका खेड्यातून सुरू होत आज पश्चिम महाराष्ट्रासारख्या सधनपट्ट्यातल्या खेडोपाडी जाऊन पोहचलीय… अपंगांचे प्रमाणपत्र काढून देणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण, वेळ पडलीच तर मोर्चे आंदोलन काढणं ही काम संघटनेच्या माध्यमातून सातत्याने सुरू होती… त्याचीच पावती म्हणून की काय 2004 च्या निवडणुकीत अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चु भाऊ अपक्ष म्हणून पहिल्यांदाच आमदार झाले… तेव्हापासून सलग चार टर्म त्यांनी अचलपूरमधून अपक्ष निवडून जाण्याचा नवा रेकॉर्ड रचला… यामुळे झालं असं की तालुक्याचा गावचा विचार करणाऱ्या बच्चू भाऊंनी आता उभ्या महाराष्ट्राला हादरे द्यायला सुरुवात केली…

आमदाराची राहुटी आपल्या गावी, घंटो का काम मिंटो मे, जनता दरबार अशी मतदार संघातील लोकांची काम मार्गी लावतानाच राज्यातील प्रश्नांना भिडण्याचीही हिंमत दाखवली… आंदोलनं ही स्टंटबाजी म्हणून नाही तर पॉवर पॉलिटिक्स म्हणून करायची असतात, हे घेरलं ते बच्चू भाऊंनीच… आदिवासी कसत असणारे शेतजमीन त्यांच्या नावावर करण्याचा शासन आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे बच्चू भाऊंनी स्वतःला जमिनीत अर्ध गाडून घेत आंदोलन केलं… आदिवासी समाजाला वनपट्टे देण्यात कचराई केल्याबद्दल अधिकाऱ्यांच्या घरात साप सोडून आंदोलन, अधिकाऱ्यांच्या सततच्या गैरहजरीमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून केलेलं अधिकारी खुर्ची लिलाव आंदोलन, कापसाला बाजार भाव दिला नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेलं सामूहिक मुंडन, दारूबंदीसाठी दारूंच्या दुकानासमोर केलेलं दूध वाटप आंदोलन, आश्वासनांचं गाजर दाखवणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्यांवर काळया रंगाचे पट्टे मारून आंदोलन, जंगल बुक आंदोलन, च्याव म्याव आंदोलन, रक्षाबंधन आंदोलन, विदर्भ मिल आंदोलन एवढंच नाही तर शोले स्टाईल पाण्याच्या टाकीवर सलग दोन दिवस राहून कर्जमाफीसाठी केलेल्या आंदोलनाने शासन आणि प्रशासनाला कित्येक वेळा सुता सारखं सरळ करण्यात बच्चू भाऊंना यश आलय…

दिव्यांगांसाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घ्यावी तेवढी कमीच आहे… देहू ते मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यावर अपंगांची पालखी यात्रा असो, अपंग बांधवांना घेऊन विधानभवनात काढलेली तीन चाकी सायकल रॅली, संपूर्ण आठवडाभर एक हात गळ्यात बांधून विधानसभेत शासनाच्या कानापर्यंत दिव्यांगांच्या समस्यांचा आवाज जाण्यासाठी बच्चु भाऊंनी हरेक प्रकारे प्रयत्न केले… आणि अनेक यशस्वीही करून दाखवले… रुग्णांसाठी निधी उभा करण्यापासून ते प्रत्यक्ष रुग्णालयात येणाऱ्या लहान सहान गोष्टींसाठी आजही प्रहारची रुग्ण सेवा समिती काम करताना दिसून येते… तब्बल 25 हजार दिव्यांगांचा दिल्लीत मोर्चा घेऊन जाणारे बच्चू कडू हे कदाचित पहिलेच अपक्ष आमदार असतील… त्यांचं सर्पमित्र असणं…आणि घोडेसवारी जमणं यांसारख्या कौशल्यांचाही त्यांनी आंदोलनासाठी वापर करून घेतला हे विशेष…

शेतकऱ्यांच्या विविध काढलेली आसूड यात्रा तर या सगळ्यांची हाइप होती.. यामुळे बच्चू कडू या नावाबद्दल प्रत्येकाच्याच मनात एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला… पण हे सगळ करूनही बच्चू कडूंना अनेक राजकीय यशापयश आले… प्रहारचा विस्तार, कामाच्या पद्धती, संघटना वाढत गेली पण म्हणावं इतपत यश संघटनेला आलं नाही… 2019 च्या निवडणुकीत प्रहारचे दोन आमदार निवडून आले… एक स्वतः बच्चू कडू तर दुसरे मेळघाटचे राजकुमार पटेल. बच्चू कडूंच्या आजवरच्या राजकारणचा फोकस हा शेतकरी, कष्टकरी, अपंग वर्गावर असल्यामुळे जमिनीवरचा कार्यकर्ता अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. पण खोक्यांच्या आरोपांमुळे बच्चू कडूंच्या प्रतिमेला बसलेला धक्का पुसण्याचं मोठं आव्हान पक्षापुढे असणार आहे… त्यात राणा यांच्या वर्चस्वाला आव्हान देऊन त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी आपलं उपद्रव्य मूल्य दाखवून दिलय… त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला एकला चलो रे चा नारा देऊन बच्चू कडूंनी मोठं पॉलिटिक्स खेळलय… आता त्यात त्यांना कितपत यश येतंय? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच…