हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेला निवडणूक आयोगाकडून बॅट (Bat Symbol) हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय पटलावर बच्चू कडू जोरदार बॅटिंग करणार असं चित्र आहे. बच्चू कडू हे जरी महायुती मध्ये असले तरी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, तसेच दिव्यांगबांधव या समाजातील तळागाळातील लोकांसाठी सातत्याने झटत असतात आणि त्यांच्या प्रश्नावरून आवाज उठवत असतात. आता हाच आवाज आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राला ऐकायला मिळणार आहे.
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने राज्य सरकारच्या विरोधात ९ ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा काढून सरकारला मोठा इशारा दिला होता. त्यांनी राज्यातील शेतकरी, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, कामगारांच्या विविध मागण्या निवेदनाद्वारे सरकारपुढे मांडल्या. ५ सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २२ सप्टेंबर ला मुंबईत धडक देणार, असा इशारा यावेळी कडू यांनी दिला. आता बच्चू कडू विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले असून त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक आयोगाकडून बॅट हे चिन्ह देण्यात आलं आहे.
भारतीय निवडणूक आयोगातर्फे प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह “बॅट” pic.twitter.com/pcGtUFd3h3
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) August 16, 2024
दिव्यांग बांधवाना बच्चू कडूंचा आधार-
राज्यातील दिव्यांग बांधवाना खऱ्या अर्थाने कोणाचा आधार वाटत असेल तर तो बच्चू कडू यांचा… महाराष्ट्राच्या पावन भूमीत दिव्यांग कल्याण मुद्दा कायम दुर्लक्षित व्हावा हे जरा भुवया उंचावणारं आहे पण याच बांधवांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारा माणूस म्हणजे बच्चूभाऊ कडू…. पुण्याच्या सरकारी कार्यालयात एका दिव्यांग बांधवांना मिळालेल्या दुय्यम वागणुकीने त्यांच हृदय ढवळून निघालं. आणि तिथूनच आरंभ झाला दिव्यांग बांधवाना त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या निर्धाराचा. देहू ते वर्षां बंगला असं त्यांनी दिव्यांग बांधवांच प्रथम आंदोलन केलं. ज्याचं नाव होतं प्रहार अपंग क्रांती आंदोलन . विखूरलेल्या दिव्यांग बांधवांना बच्चूभाऊ कडू यांच्या रूपाने पहिले सक्षम नेतृत्व मिळाले.
त्यांच्या या आंदोलनाची दखल अखेर केंद्र सरकारलाही घ्यावी लागली. त्यांच्या आंदोलनाचं फलित म्हणजे 1995 साली संजय गांधी निराधार योजनेचा मासिक हप्ता 600 रुपयावरून 1000 रुपयांपर्यंत गेला. दिव्यांग बांधवासाठीचा 3% राखीव निधी 5% पर्यंत गेला. 1995 च्या अपंग पुनर्वसन कायद्याची कडक अंमलबजावणी सुरु झाली. ग्राम पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका येथे 3% निधी, 3% गाळे वाटप, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 3% आरक्षण या सर्व हक्कांना नवसंजीवनी मिळाली. बच्चू भाऊंच्या या सर्व कार्याची पोचपावती म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापन केलेलं दिव्यांग मंत्रालय होय. आजही बच्चूभाऊ कडू यांचा आवाज दिव्यांग बांधवासाठी महाराष्ट्र विधानसभेत घुमतो आहे
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र आपण तकरी, शेतमजूर आणि दिव्यांगबांधव यांचे मुद्दे घेऊनच शरद पवारांना भेटलो. तूर्तास महायुती सोडून महाविकास आघाडीसोबत जाण्याचा कोणताही हेतू नाही असं बच्चू कडू यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होते. मात्र शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगबांधवांसाठी आम्ही काहीही करू असं म्हणत बच्चू कडू यांनी थेट महायुतीला इशाराही दिला होता. जो काही निर्णय असेल तो आम्ही १ सप्टेंबर नंतर जाहीर करू असं म्हणत बच्चू कडू यांनी राज्यातील महायुती सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही राजकारण आणखी बदलण्याची शक्यता आहे.