हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बच्चू कडू… (Bacchu Kadu) या नावानं आपल्या प्रहार पक्षाच्या (Prahar Janshakti Party)
माध्यमातून अनेक प्रस्थापितांना घाम फोडला… सरकार कुणाचंही असो मंत्रीपदासाठी बच्चू भाऊंचं नाव चर्चेत कायम असतं… ते म्हणायला महायुतीत असले तरी महायुतीत नाहीत… आणि महाविकास आघाडीही त्यांच्यापासून फारशा अंतरावर नाही… थोडक्यात सत्ता समतोल कसा साधायचा? याचं पॉलिटिक्स बच्चुभाऊंना चांगलं जमतं… वंचित, गोरगरीब आणि सामान्यांच्या प्रश्नाला न्याय देत त्याचं राजकारण करण्याची कला महाराष्ट्रात फक्त त्यांनाच जमली… म्हणूनच प्रहार आता महाराष्ट्रातील 20 विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापितांवर येणाऱ्या विधानसभेला प्रहार करतील अशी एकूणच माहिती समोर येतेय… महाराष्ट्रात अनेक दबावगट तयार झाले असले तरी राजकारणाची अचूक नस ओळखून प्रहार या 20 मतदारसंघांवर असा काही प्रभाव टाकू शकतो, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते… त्यामुळे बच्चु भाऊ यांनी टारगेट केलेले 20 मतदारसंघ नेमके कोणते आहेत? आणि या सर्व ठिकाणी प्रहार कशी ताकद देऊन विधानसभेत दिसेल? त्याचाच हा सविस्तर आढावा…
बच्चू कडू आणि प्रहारच्या राजकारणाची मुळं जिथं रुजली त्या अचलपूर विधानसभेत (Achalpur Constituency) सलग चार टर्म आमदार असल्याने बच्चू कडू सांगतील ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ असं म्हणत अचलपुरची जनता त्यांच्या पाठीशी कायम असते…यासोबत मेळघाटमध्ये राजकुमार पटेल प्रहरचे आमदार असल्याने या दोन जागा प्रहार यंदाही आरामात निकाली काढतील… असं सध्या चित्र आहे…शेजारच्या दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना अमरावतीत लोकसभेला बच्चू कडू यांनी मदत केली. त्यामुळे या मदतीचा बच्चू कडू यांना दर्यापूरमध्ये फायदा होऊ शकतो. तर बडनेरामध्ये रवी राणा आणि महाविकास आघाडी यांच्या विरोधातील मतांसाठीही प्रहारला मतदान होऊ शकते. अमरावतीत रवी राणा यांना टफ फाईट बच्चू कडूच देऊ शकतात. त्यांना अंगावर घेऊ शकतात अशी त्यांची इमेज तयार झाली आहे. नवनीत राणा यांच्यामागे भाजपने सारी ताकद लावूनही प्रहारच्या प्रभावाने राणांना आपली खासदारकी वाचता आली नाही… त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही राणा दांपत्याच्या प्रस्थापित राजकारणाला बच्चू भाऊच पुरून उरतील, असं एकूणच चित्र आहे…
आता येतो तो हायव्होल्टेज चांदवड विधानसभा मतदारसंघात… चांदवडमध्ये कांद्याचा मुद्दा गाजला होता. पहिले कांद्याचे आंदोलन इथूनच सुरु झाले होते… लोकसभेप्रमाणेच ही निवडणूक देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढवली गेल्यास प्रहारला मतदान होऊ शकते… त्यामुळे इथले भाजपचे स्टॅंडिंग आमदार राहुल आहेर आणि काँग्रेसचे शिरीषकुमार कोतवाल यांना इथून प्रहारचा उमेदवार निर्णायक लढत देऊ शकेल… तर दुसऱ्या टोकाला माण खटावमध्ये प्रहार कणाकणाने पक्षाची ताकद वाढवत असून आता मजबूत पक्ष संघटन झालय.. म्हणूनच प्रहारकडून ज्यांच्या नावावर पहिल्यांदा शिक्कामोर्तब झाला त्या अरविंद पिसे यांच्याकडे सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत… जयकुमार गोरे हे इथले स्टँडिंग भाजप आमदार असले तरी पाण्याच्या प्रश्नांपासून ते अनेक पातळ्यांवर त्यांच्याबद्धल मतदारसंघात सध्या विरोधात वारं आहे.. महाविकास आघाडीडून प्रभाकर देशमुख इच्छुक असले तरीही तिकीट फिक्स म्हणता येणार नाही. त्यात पिसे यांनी कार्यकर्त्यांचं जाळ विणत प्रहार पक्ष मतदार संघात तळागाळात जाऊन पोहोचवलाय… पिसे यांच्या पाठीशी असणारी जनशक्ती आपल्या मागे राहावे यासाठी अनेक राजकीय मातब्बरांनी त्यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवले… पण ते कायम एकनिष्ठ राहून आता स्वतः प्रहारचे उमेदवार असल्याने सातारा जिल्ह्याला प्रहारचा पहिला आमदार मिळेल, असा तगडा विश्वास सध्या पक्षाला आहे…
यानंतर मतदारसंघ येतो तो उमरग्याचा… तब्बल 15 वर्ष आमदार असूनही उमरगा मतदारसंघात पायाभूत सुविधा, रोजगार, औद्योगिक प्रकल्प, शिक्षण संस्था, एमआयडीसी याची वाणवा आहे. उमरगा शहरातही आठवड्यातून एकदा पाणी येते. त्यामुळेच ज्ञानराज चौगुले यांच्याबद्दल बरीच नाराजी असल्याचे मतदारसंघात दिसून येते. पण यामुळे इथे ठाकरे गटाला मतदान होईल, असंही म्हणता येणार नाही. कारण चौगुले बंडा आधी तेरा वर्ष शिवसेनेचाच भाग होते. त्यामुळे जनता महायुतीला तर कंटाळली आहेच… पण ठाकरेंच्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडीलाही कंटाळली आहे. अशा परिस्थितीत बच्चू कडू इथे गेमचेंजर ठरू शकतात. उमेदवारांना तिसरा पर्याय तगडा मिळाल्यास मतदान करताना प्रहारला इथे मोठा गेन मिळू शकतो…
अकोट हा चांदूरबाजार आणि आचलपूरला लागूनच असलेला तालुका… या मतदारसंघातही प्रहारचं चांगलं मतदान आहे. प्रहारचे प्रदेशाध्यक्ष हेच इथून दरवर्षी उमेदवार असतात.. गेल्या टर्मला तब्बल 30 हजारांचं त्यांचं मतदान येणाऱ्या काळात आणखीन पुढे जाईल यात शंका नाही… त्यामुळे भाजपचे स्टॅंडिंग आमदार प्रकाश भारसाकळे यांना प्रहारचा सध्या मोठा धोका आहे… काँग्रेसकडून महेश गणगणे यांनीही गतवेळी प्रहारच्याच धसक्याने इथून माघार घेतली होती. आता ते लढवतील की नाही हे त्यांना आणि पक्षालाच माहिती पण प्रहारचा उमेदवार इथे गेमचेंजर करणार एवढं नक्की.. रामटेकमध्येही प्रहारला असणारा सपोर्ट दुर्लक्षित करून चालणार नाही… त्यात युती आणि आघाडींच्या इच्छुकांच्या ताकदीचा विचार करता प्रहारसाठी यंदा घोडेमैदान जवळचं आहे… गतवेळी प्रहारच्या उमेदवाराने इथे 24 हजार मते घेतली होती. यंदा हा आकडा वाढून विजयापर्यंतही जाऊ शकतो.
रावेरमध्ये सध्या अनिल चौधरी हे नाव चांगलंच चर्चेत आलय… चौधरी हे मागच्या बऱ्याच दिवसांपासून विधानसभेची तयारी करतायत… शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंदोलन करतायत…. बच्चू कडू यांनीही अनेकदा आंदोलनांना उपस्थित लावत चौधरी यांना ताकद दिलीय… नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे प्रहारच्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप करत भाजपला मतदान न करण्याचा आवाहन प्रहारने केले होते. त्यावेळी अनिल चौधरी चर्चेत आले होते… येणाऱ्या विधानसभेला ते रावेरमधून पुन्हा घाव घालणार असल्याने प्रहारला इथून विजयाचे जास्त चांस्नेस आहेत…धुळे ग्रामीण आणि धुळे शहर या दोन्ही मतदारसंघात मतदारांना गृहीत धरून चालत नाही… याचे उदाहरण मतदारांनी मागील काही निवडणुकांमध्ये दाखवून दिले आहेच… याचाच विचार करून शेती, माती आणि वंचितांच्या प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून प्रहार राजकारणात उतरल्याने इथल्या राजकीय निष्क्रियतेचा फायदा प्रहारच्या पथ्यावर पडू शकतो…
कारंजा मतदारसंघात राजेंद्र पाटणी यांच्या निधनानंतर इथे नेतृत्वाची मोठी पोकळी तयार झाली आहे… त्यात विरोधात तगडा उमेदवार असल्याने इथे भाजपच्या उमेदवाराला थेट प्रहरसोबत दोन हात करावे लागणार आहेत…मुखेड आणि जळगाव जामोद या दोन्ही विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे स्टॅंडिंग आमदार असले तरी अँटीइन्कंबंसीचा मोठा फटका या विद्यमान आमदारांना बसण्याचे फुल टू चान्सेस आहेत… पण इथे दुसऱ्या आघाडीचीही ताकद कमी असल्याने प्रहार या दोन्ही जागांवर निर्णायक इम्पॅक्ट टाकू शकते…अहमदपूर चाकूर मतदारसंघाचा लोकसभेचा निकालच इथले स्टँडिंग आमदार महायुतीच्या बाबासाहेब पाटलांच्या विरोधात गेलाय… त्यामुळे इथं सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण असलं तरी आघाडीला इथं प्रहारला विश्वासात घेतल्याशिवाय राजकारण करता येणार नाही, एवढं मात्र नक्की…यासोबतच परभणी, राधानगरी आणि निलंगा याही विधानसभा मतदारसंघात प्रहारची ताकद वाखणण्याजोगी असल्याने त्याला बच्चूभाऊंची साथ मिळाली तर इथे निकाल कोणत्याही बाजूने झुकू शकतो…
या सगळ्याचा सार सांगायचा झाला तर एकट्या विदर्भातच नाही तर त्यासोबत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही यंदा बच्चू कडूंच्या प्रहारची जादू पाहायला मिळेल… केवळ तिसरा पर्याय न देता… फक्त मतांचं विभाजन करणे याच एका परपजने प्रहारचे हे उमेदवार निवडणूकीत उतरले नाहीयेत, तर विजयाचा गुलाल अंगावर घेणं यासाठी पक्षानं आणि प्रत्येक उमेदवारानं प्रहार घराघरात पोहचवलीय…त्यामुळे यश अपयश हा पुढचा भाग असला तरी विधानसभेला बच्चू कडू यंदा निर्णायक लढत देत प्रस्थापितांच्या राजकारणावर प्रहार करतील, एवढं मात्र नक्की…