हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. जागावाटप, सभा आणि मेळाव्यांचे आयोजन केलं जात आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होईल असं वाटत असतानाच तिसऱ्या आघाडीमुळे राजकारणातील रंगत आणखी वाढली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे छत्रपती यांनी तिसऱ्या आघाडीची स्थापना करून महाविकास आघाडी आणि महायुतीला आव्हान दिले आहे. परिवर्तन महाशक्ती असं या आघाडीचे नाव आहे. आता तर आम्ही सर्वच्या सर्व 288 जागा लढवणार असून मुख्यमंत्री आमचाच होईल असं म्हणत बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकारला ललकारल आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, सरकारने जे निर्णय घ्यायला हवे होते ते घेतले नाहीत. मी १८ मागण्या घेऊन सरकारकडे गेलो होतो, मात्र त्यातील एकही मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचार केला नाही. आम्ही तर म्हंटल होते कि तुम्ही आमच्या अर्ध्या मागण्या जरी पूर्ण केल्या तरी मी माझा स्वतःचा मतदारसंघ शिंदे गटाला देईन. मात्र त्यांनी आमचं ऐकलं नाही. ही एकप्रकारे सरकारची मग्रुरी आहे. अखेर आम्ही दगड ठेऊन ही परिवर्तन महाशक्ती उभी केली आहे. किंबहुना आम्ही जे बोलतो ते पत्थर की लकीर आहे. हि महाशक्ती सरकारला लढा देण्याचे काम करेल असं म्हणत बच्चू कडू यांनी महायुती सरकारला इशारा दिला. आम्ही जनतेला मजबूत पर्याय देऊ, दुसऱ्या कोणाला पाठिंबा देण्याची गरज आम्हाला पडणार नाही. महाराष्ट्रात महाशक्तीचाच मुख्यमंत्री होईल. संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असं राज्य आम्ही उभं करू असं बच्चू कडू यांनी म्हंटल.
भाजपमुळेच शिंदेंचे 4 खासदार पडले-
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हस्तक्षेपामुळेच शिंदे गटाच्या ४ खासदारांचा पराभव झाला असा गंभीर आरोप सुद्धा बच्चू कडू यांनी केला. भाजपने हस्तक्षेप केला नसता तर शिंदे गटाचे किमान ४ खासदार आणखी वाढले असते. मित्र म्हणून मानेवर सूरी ठेवण्याचे काम भाजपने केलं असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर टीका केली. तसेच संजय राऊत म्हणजे शिवसेनेचे आकाशवाणी केंद्र आहे. ते फक्त ब्रेकिंग न्यूज देतात पण अभ्यास काहीच करत नाहीत, त्यांनी अभ्यास करावा, महाराष्ट्र म्हणजे त्यांची जहागिरी नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी राऊतांवरही हल्लाबोल केला.