2014 ला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन केला अन्….; बाळा नांदगावकर यांचा मोठा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2014 साली शिवसेनेची भाजपसोबत युती तुटली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन केला होता. आपल्याला आता एकत्र यावे यावे लागेल असे ते म्हणाले होते पण नंतर आम्हाला त्यांनी फसवले असा गौप्यस्फोट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलाय. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते.

बाळा नांदगावकर म्हणाले, उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंबद्दल कधीही आपुलकी नव्हती. 2014 साली शिवसेनेची भाजपसोबत युती तुटली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन केला होता. आपल्याला आता एकत्र यावे यावे लागेल असे म्हणाले. त्यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या प्रमुख नेत्यांना बोलावून सांगितले की मोतोश्रीवरुन फोन आला आपल्याला एकत्र यावे लागेल. आम्ही तेव्हा तयारी सुद्धा केली होती. मात्र त्यावेळी तुम्ही आम्हाला फसवले. शेवटच्या दिवसापर्यंत एबी फॉर्म दिले नाहीत. तुम्हाला भीती होती की राज ठाकरे भाजपसोबत जातील, तुम्हाला छोटा भाऊ नको होता अस म्हणत बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.

त्यानंतर 2017 साली शिवसेना आणि मनसेने एकत्र यावे, दोन्ही भावांनी एकत्र यावे यासाठी मी मातोश्रीवर गेलो होतो. तुम्ही मोठे भाऊ व्हा, आम्ही छोटे भाऊ होतो असे प्रोपोजल घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होता पण तेव्हा तुम्हीच शिवसेनेत या अस उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले असा गौप्यस्फोट यावेळी बाळा नांदगावकर यांनी केला.

उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांविषयी बोलणारी आणि हिंदू देव-देवतांचा अपमान करणारी ताई चालते. दाऊदशी व्यवहार करणारे लोक चालतात. बाळासाहेब ठाकरेंना कोण बाळासाहेब हे विचारणारे खासदार चालतात. मात्र भाऊ राज ठाकरे चालत नाहीत, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली. तसेच राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची धुरा सोपवली असती तर नारायण राणे बाहेर पडले नसते, एकनाथ शिंदे बाहेर पडले नसते आणि 40 आमदारही सोडून गेले नसते अस म्हणत बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या वर जोरदार निशाणा साधला आहे.