Balasaheb Desai : लोकनेते बाळासाहेब देसाईं पद्मश्री पुरस्कारापासून वंचित; शिंदे सरकार केंद्राकडे शिफारस करणार तरी कधी??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अनेक नेते होऊन गेले. मात्र, या नेत्यांमधील एक असा लोकनेता होऊन गेला कि त्याने गरीब, कष्ठकरी कुटूंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षणासाठी E.B.C सवलत चालू करून दिली. राज्य गहाण पडले तरी चालेल पण राज्यातील पोरं शिकली पाहिजेत असे म्हणणारे महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) हे होय. शिक्षण आणि राजकारणात आपले आयुष्य खर्ची केलेल्या या लोकनेत्याला अजूनही पद्मश्री पुरस्कार मिळालेला नाही. हे लोकनेते अजूनही पद्मश्री पुरस्कारपासून वंचित आहे. राज्यात सत्तेत असलेले एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस, अजितदादांचे महायुतीचे सरकार या लोकनेत्याला पदमश्री पुरस्कार देण्याची केंद्र सरकारकडे करणार का? हा प्रश्न आज सर्वसामान्यातून उपस्थित केला जात आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पद्मश्री पुरस्काराची घोषणा राज्य सरकारने केल्यास हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. आज लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांची ११४ वी जयंती. याबाबत लोकनेत्याच्या कार्याचा ‘हॅलो महाराष्ट्र’ने घेतलेला आढावा…

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलरेल्यवा कोयना धरणाचा तालुका म्हनूणजे पाटण (Patan Taluka) हा होय. या पाटण तालुक्यातील विडे या गावात आजोळी १० मार्च, १९१० या दिवशी स्व. बाळासाहेब देसाई यांचा जन्म झाला. त्यांचे गाव मूळ पाटण तालुक्यातील मरळी. समोर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी परिश्रमपुर्वक मात केली. शिकून मोठे झाले पाहिजे ही इच्छाशक्तीची शिदोरी घेऊन शिक्षणासाठी त्यांनी याच्या अवघ्या आठव्या वर्षी घराचा त्याग केला. परिस्थितीवर मात करताना त्यांनी चिरमुरे खाऊन दिवस काढले. 1925 मध्ये सातवीनंतरचे शिक्षण कोल्हापूरला घेताना संकटांना न जुमानता जेवणाचे वार लावले. काहीवेळा उपाशीपोटी राहून त्यांनी चिकाटीने दारिद्र्य सहन करत पुढचे शिक्षण घेतले. शिक्षणप्रेमी बाळासाहेबांनी एक वर्षात इंग्रजी अभ्यासक्रमाच्या तीन इयत्ता पूर्ण केल्या. अन्नाअभावी वर्गात घेरी येऊन पडणाऱ्या बाळासाहेबांनी बारा वर्षाच्या खडतर तपानंतर बी.ए., एलएल. बी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले.

पंडित नेहरूंनी पाठीवर मारली शाबासकीची थाप

बाळासाहेब देसाई यांनी अत्यंत गरिबीतून पुढे येत शिक्षण घेतले. त्यांनी कष्टातून पुढे आपले विश्व निर्माण केले. त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विविध विभाग सांभाळले. प्रत्येक विभाग सांभाळताना निर्णय घेत त्यांनी आपला ठसा उमटविला. गरिबांच्या मुलांसाठी घेतलेल्या मोफत शिक्षणाच्या निर्णयामुळे तत्कालिन प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी त्यांना शाबासकी दिली होती.

गेट वे ऑफ इंडिया उभारणीत राहिलय महत्वाचं योगदान– Balasaheb Desai

महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर बाळासाहेब देसाई यांनी विविध विभाग सांभाळले. प्रत्येक विभागात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रस्ते आणि पुलांच्या माध्यमातून राज्यभर दळणवळणाचे जाळे विकसित केले. इतकच काय तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर मधील पोरांना उच्चशिक्षण मिळावं म्हणून त्यांच्याच काळात कोल्हापूर इथे शिवाजी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रातल्या गडकिल्लांना रस्तेमार्गाने जोडण्याच काम केलं तर गेट वे ऑफ इंडिया तसेच दादरच्या शिवाजी पार्कवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात त्यांच योगदान राहिलं आहे.

नातू शंभूराजेंनी आजोबांच्या पदमश्री पुरस्कारासाठी केली होती मागणी

सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते तथा उत्पादनशुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ठाकरे गटात असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केंद्राकडून बाळासाहेब देसाई यांना मरोणोत्तर पद्मश्री पुरस्कार द्यावा, अशी आपण मागणी करावी, अशी विनंती केली होती. परंतु बाळासाहेब देसाई यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्याच्या मागणीकडे ठाकरेंनी दुर्लक्ष केलं. ठाकरेंनी केंद्राकडे साधी मागणी देखील केली नसल्याचा आरोप शंभूराज देसाईंनी केला होता. त्यानंतर आतासुद्धा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले होते. मात्र, त्यांच्या या मागणीची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून कधी दखल घेतली जाणार हे पहावे लागणार आहे.

वकील ते एक उत्तम राजकारणीच्या माध्यमातून कर्तृत्वाने उमटवला वेगळा ठसा

बाळासाहेब देसाई यांचा जन्म 10 मार्च 1910 रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील मरळी येथे झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमधून पूर्ण केले. अत्यंत खडतर परिस्थितीला तोंड देत त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी मराठा वसतीगृहात राहून राजाराम कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. 1939 मध्ये पाटण व कराड येथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय करण्यास प्रारंभ केला. देसाई यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय भाग घेतला होता. तसेच स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी कित्येक स्वातंत्र्य सैनिकांना अनेक प्रकारची मदत केली होती. त्यांनी 1941 पासून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करुन महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रावर आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटविला.

बाळासाहेबांना नियतीने चिरंतन असणारे लोकनेतेपद बहाल केले

आपल्या राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभी बाळासाहेब 12 वर्षे लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे तसेच त्यासाठी करवाढ करणारे ते राज्यातील पहिले अध्यक्ष होते. देसाई 1952, 1957, 1962, 1967, 1972 व 1978 असे सहा वेळा सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांनी 1956 मध्ये विधानमंडळ कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद, 1957 ते 1960 सार्वजनिक बांधकाम मंत्री, 1960 ते 1962 शिक्षणमंत्री, 1962 ते 1963 कृषीमंत्री व 1962 ते 1967 गृहमंत्री व कॉंग्रेस पक्षाचे उपनेते म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. त्यांनी जुलै 1977 ते मार्च 1978 या काळात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदही भूषविले होते. नियतीने न्याय दिला असता तर बाळासाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. मात्र, हे मर्यादित कालावधीचे पद देण्यापेक्षा नियतीने त्यांना चिरंतन असणारे लोकनेतेपद बहाल केले. स्वातंत्र्योत्तर काळात लोकनेते या संबोधनाने गौरवांकित झालेले बाळासाहेब हे महाराष्ट्रातील पहिले प्रमुख नेते आहेत.

कोयनेच्या भूकंपानंतर पोलादी पुरुष धावला थेट मदतीला…

कोयना भागासह पाटण तालुक्यातील अनेक गावांना 11 डिसेंबर 1967 रोजी पहाटे 4 वाजून 21 मिनिटांनी 6.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरवून टाकले होते. कोयना भागासाठी ही काळरात्र ठरली. कारण या भूकंपाच्या धक्क्याने 185 जणांना आपला प्राण गमवावा लागला. सुमारे 40 हजारावर घरे बाधीत झाली. 936 पशुधन यामधे दगावले. तसेच अनेक ठिकाणी जमिनीना मोठ्या भेगा पडल्या. त्या काळरात्री झोपताना उद्याची नवी स्वप्न पाहणारे काळाच्या झोपेतून उठलेच नाहीत, या भूकंपात साऱ्या पाटण तालुक्याच्या जनतेचे अश्रू पुसण्यासाठी महाराष्ट्राचे पोलादी पुरूष, तत्कालीन महसूलमंत्री, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी थेट तालुका गाठला. परिस्थितीची पाहणी करत जनतेस आधार देण्याचा प्रयत्न केला. बाधित कुटुंबियांसमवेत थांबून मायेची ऊब दिली. संसारोपयोगी साहित्याची मदत व हजारो नवीन घरांची उभारणी केली.

गिरणी कामगारांवर गोळी चालवणार नाही म्हणत दिला गृहमंत्री पदाचा राजीनामा

यशवंतराव पहिल्यांदा द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले होते. बाळासाहेब देसाई आक्रमक होते. सर्वसामान्य जनते बद्दल त्यांना कळवळा होता. गिरणी कामगारांची बाजू त्यांना पटत होती पण कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी गृहमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणे देखील गरजेचे होते. जेव्हा कामगार नेत्यांनी बंद पुकारला तेव्हा त्यांनी हा बंद बेकायदेशीर आहे व तो पाळू नका असे आवाहन केले. पण कामगारांनी तरीही मोर्चा काढला. या मोर्चाला विराट गर्दी झाली. गिरणी मालकांच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या. कडक पोलीस बंदोबस्त होता पण तरीही आंदोलनाला हिंसक वळण लागले. जोरदार दगडफेक सुरु झाली. आंदोलन नियंत्रणाबाहेर गेले होते, पोलीस शर्थीने ते थांबवण्याचा प्रयत्न करत होते. गृहमंत्र्यांनी याला थेट नकार कळवला. त्यामुळे संतापलेल्या मुंबई काँग्रेसने त्यांच्याविषयीची नापसंती दर्शविणारा ठराव केला. भडक स्वभावाच्या बाळासाहेब देसाईंना क्रोध अनावर झाला. कितीही झालं तरी आंदोलक हे आपल्या देशाचे नागरिक आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणे अमानुष आहे हे बाळासाहेबांचं मत होतं. त्यांनी याच तिरमिरीत येऊन मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा पाठवून दिला आणि गाडीत बसून पाटणला निघाले देखील.

सर्वात पहिल्यांदा पवारांची ओळख बाळासाहेब ठाकरें सोबत करुन दिली होती

शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन शक्तीपीठं. दोघेही पक्षप्रमुख. दोघांच्या राजकारणाची सुरवात देखील जवळपास सारखीच झाली. शरद पवार १९६७ साली बारामती येथून निवडून आमदार म्हणून निवडून आले तर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना १९६६ साली केली. या दोघांनी महाराष्ट्राच राजकारण एका उंचीवर नेवून ठेवले. विशेष म्हणजे एकमेकांच्या तोंड न बघण्याऱ्या आजच्या या राजकारणात बाळासाहेब आणि पवारसाहेबांची मैत्री आदर्शच ठरावी. विशेष म्हणजे या दोघांची पहिल्यादा भेट घडवून आणली ती बाळासाहेब देसाई यांनी होय.

लोकनेत्यांचा नातू रूबाबात फिरला पाहिजे ठाकरेंनी शंभूराजेंना आणली होती लाल दिव्याची गाडी

पाटण तालुक्याचे सुपूत्र लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत राज्याच्या मंत्रीमंडळात विविध खात्याची मंत्रीपदे भूषविली होती. गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात ईबीसी सवलत त्यांनी लागू केली होती. लोकाभिमुख निर्णयामुळे बाळासाहेब देसाई लोकप्रिय ठरले होते. यामुळे शिवसेनाप्रमुख आणि लोकनेत्यांची खास मैत्री होती. मित्राचा नातू शिवसेनेत प्रवेश करतोय, म्हणून २० नोव्हेंबर १९९७ रोजी मरळी (ता. पाटण) येथील शंभूराज देसाईंच्या पक्ष प्रवेशासाठी स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आले होते. तसेच कार्यक्रमाला येताना ते लाल दिव्याची गाडी घेऊन आले होते. लोकनेत्यांचा नातू रूबाबात फिरला पाहिजे, म्हणून ही गाडी घेऊन आलो आहे, असे बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले होते.