पश्चिम महाराष्ट्राचा भाग सोडल्यावर आज होणाऱ्या पाचव्या टप्प्यात पवारांची तुतारी मुंबईत देखील एका जागेवर वाजणार आहे… आणि ही तुतारी वाजवण्याचं काम करणारा अवलिया आहे बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे… मुंबईतील भिवंडी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बाळ्यामामा विरुद्ध भाजपकडून दोन टर्मचे खासदार राहिलेले कपिल पाटील यांच्यात अटीतटीची लढत होतेय… प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत… मतदानही पार पडेल… पण भिवंडीची चर्चा होतेय ती तब्बल दोन टर्म खासदार राहिलेल्या आणि राज्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या कपिल पाटलांसारख्या बड्या नेत्याला शरद पवारांचा बाळ्या मामा काही केल्या तिसऱ्यांदा लोकसभेवर पाठवणार नाही याची… आधीच मुंबईमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमकुवत असताना एकही खासदार पवारांना इथून निवडून आणता आला नव्हता. आता मात्र पक्ष फुटल्यानंतर मुंबईतल्या याच भिवंडीत पवारांची तुतारी वाजणार, याची बरीच चर्चा आहे… भाजप आणि शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी तुतारी वाजवण्याचा कार्यक्रम कसा टप्प्यात आणलाय? बाळ्या मामा भिवंडीचे राष्ट्रवादीचे पुढचे खासदार असतील, हे आम्ही इतक्या आत्मविश्वासाने का सांगतोय? तेच पाहुयात
तिकीट वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना भिवंडीतून पंचायती राज्यमंत्री पदावर असणाऱ्या भाजपचे दोन टर्मचे खासदार कपिल पाटील यांना तोडीस तोड देईल असा एकही चेहरा महाविकास आघाडीकडे दिसत नव्हता… पाहायला गेलं तर भाजपच्या विरोधात काँग्रेसने उमेदवारी देण्याची भिवंडीची परंपरा… पण इथं शरद पवारांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावत हुकूमाचा एक्का बाहेर काढला आणि तो म्हणजे बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे… बाळ्या मामांना तुतारीच्या चिन्हावर तिकीट जाहीर झालं… आणि कपिल पाटलांना तोडीस तोड उमेदवार मिळाला… तब्बल पाच वेळा पक्ष बदलणाऱ्या बाळ्या मामा यांची भिवंडीतील क्रेज मात्र काही केल्या कमी झाली नाही… मनी आणि मसल पॉवर दोन्हीही मजबूत असणारे बाळ्यामामा यंदा काहीही केलं तरी भिवंडीत भाजपच्या कमळाला बाजूला करत तुतारीचा आवाज वाढवणार हे आत्मविश्वासाने सांगता येतं त्याचं पहिलं कारण म्हणजे पाटलांच्या विरोधातील अँटी इन्कमबन्सी आणि बाळ्यामामा यांची क्रेझ…
तब्बल दोन टर्म खासदार असतानाही विकासकामांचा खोळंबा झाल्याने भिवंडीमध्ये कपिल पाटलांच्या विरोधात अँटी इनकमबन्सी आहे… भिवंडीतील रस्त्यांचा आणि सर्वात महत्त्वाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही कायम असल्यानं भिवंडीतील नागरिकांना बदल हवा आहे… तर दुसऱ्या बाजूला मसल पॉवर, गोडाऊन लॉबीवर असणार वर्चस्व यामुळे बाळ्यामामा यांची मतदारसंघात चांगली क्रेझ आहे. भाजपच्या उमेदवारांना मागील चार टप्प्यात राज्यात फटका बसत असल्याचं उघड उघड दिसत असताना भिवंडीही याला अपवाद राहणार नाही. त्यात बाळ्यामामा यांचा आगरी समाजावरचा होल्ड आणि राजकारणात नेहमीच निर्णायक ठरण्याची भूमिका या दोन्ही गोष्टी बाळ्यामामा यांना पाटलांपेक्षा भिवंडीच्या राजकारणात जास्त प्लस मध्ये ठेवतात…
दुसरं कारण येतं ते भाजपचं बिघडलेलं परसेप्शन
अबकी बार 400 पार… असं कॅम्पेन करणाऱ्या भाजपला संविधान बदलायचं आहे. असं म्हणत विरोधकांनी टार्गेट केल्याने अल्पसंख्यांक समाज हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपापासून लांब गेला… त्यात मुस्लिम समाजाविषयी पंतप्रधानांकडून केली गेलेली वक्तव्य यामुळे काठावर असणारा मुस्लिम समाजही इंडिया आघाडीकडे शिफ्ट झालाय. याचा मोठा फटका भिवंडीतही भाजपला बसणार आहे. करण भिवंडीत मुस्लिम समाजाचा मतदानाचा टक्का हा नेहमीच निर्णायक ठरत आलाय… जातीची मतं एकगठ्ठा कदाचित शिफ्ट होऊ शकत नाहीत. पण मुस्लिम मतं ही एकगठ्ठा होतात. त्याचा मोठा इंपॅक्ट हा मतदानावर दिसतो… बाळ्यामामा शरद पवारांच्या पक्षात असल्याने एक धर्मनिरपेक्ष पक्षाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातय… हेच पाहता बाळ्यामामा यांना मुस्लिम समाज हा भरभरून मतदान करेल, असा एकूणच अंदाज आहे… भाजपने प्रचार सभांमधून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला असला तरी तो सामान्य मतदारांना काही पटलेला नाहीये… त्यामुळे बाळ्यामामा यांचं पारडं भिवंडीमध्ये सध्या तरी जास्त दिसतय…
तिसरा मुद्दा येतो भावनिक लाट आणि मविआची एकजूट
मुंबईतील जवळपास सर्वच जागा महाविकास आघाडीकडून सर्व प्रकारचे मतभेद बाजूला ठेवून लढवल्या जातायत…भिवंडीतही बाळ्यामामा यांच्या पाठीशी मविआचे सर्व मित्रपक्ष ताकद लावून आहेत. कागदावर पाहिलं तर महायुती, कपिल पाटील जड जाणार असं वाटत असलं तरी देखील ग्राउंड मात्र बाळ्यामामांच्या बाजूने आहे… मुंबईत उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट कायम आहे. शरद पवारांनाही तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात भावनिकतेवर मोठं व्होट झाल्याचं आपण पाहत आहोतच. दोन टर्म रेसमध्ये नसली तरी काँग्रेस भिवंडीमध्ये स्ट्रॉंग आहे… त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांची थोडी थोडी ताकद आणि त्यात बाळ्यामामा यांची वैयक्तिक ताकद लागत असल्याने मतदान घासून होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला कपिल पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गतच अनेक स्थानिक आमदारांची नाराजी आहे. शिवसेना शिंदे गट सोबत असला तरीदेखील कपिल पाटील यांनी भिवंडीत या शिवसेनेच्या आमदारांना आडकाठी घातली होती, त्यामुळे त्यांचीही पाटलांवर नाराज आहे…त्यात बाळ्यामामा यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जवळचे संबंध पाहता तुतारी भिवंडीत जास्त फ्रंटला दिसतेय…
हे सगळं पाहता पश्चिम महाराष्ट्र पाठोपाठ मुंबईतल्या भिवंडीतही शरद पवारांच्या तुतारीचा आवाज यंदा घुमणार हे फिक्स वाटतंय. भाजपचा आणि विशेष करून राज्यमंत्री राहिलेल्या कपिल पाटलांचा जर इथून पराभव होत असेल तर ही भाजपासाठी नक्कीच मोठी नाचक्की ठरू शकते. जाता जाता एक महत्त्वाची अपडेट. भिवंडीची निवडणूक जरी बाळ्यामामा विरुद्ध कपिल पाटील अशी होत असली तरी जिजाऊ संघटनेचे निलेश सांबारे यांनी देखील भिवंडीतून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. वंचितची ताकद त्यांच्यासोबत असल्यानं आणि या भागात त्यांच्या संघटनेचा असणारा वरचष्मा पाहता मतविभाजनाचा मोठा फटका कपिल पाटील आणि बाळ्यामामा यांना बसणार आहे…तर अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये भिवंडीत 4 जूनला नेमकं काय होणार? कपिल पाटील विजयाची हॅट्रिक मारणार की पवारांचा बाळ्यामामा पहिल्याच झटक्यात दिल्ली गाठणार? तुम्हाला काय वाटतं? तुमचंही मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.