हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतामध्ये अनेक विमानतळे उभारण्यात आली आहेत. परंतु त्यातील बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ (टी २) जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी एक अशी ओळख स्थापित केली आहे. या विमानतळाला युनेस्कोच्या प्रिक्स व्हर्साय द्वारे (UNESCO Prix Versailles) ‘इंटिरिअर २०२३ साठी जागतिक विशेष पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.
युनेस्कोकडून मान्यता मिळालेले केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील एकमेव भारतीय विमानतळ ठरले आहे. या विमानतळाची स्थापना 2015 साली करण्यात आली होती. तेव्हापासून ते आजवर या विमानतळाने, नाविन्यपूर्णता, सर्जनशीलता, स्थानिक वारशाचे प्रतिबिंब, पर्यावरणीय कार्यक्षमता आणि सामाजिक परस्परसंवादाची मूल्ये जपली आहेत. त्यामुळेच आज ते जगातील सर्वात सुंदर विमानतळ ठरले आहे.
दरम्यान, केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळातील टर्मिनल-२ (टी २) दोन लाख ५५ हजार ६६१ चौरस मीटरमध्ये केवळ चार खांबांवर उभे करण्यात आले आहे. 11 नोव्हेंबर 2022 रोजी उद्घाटन झालेल्या टर्मिनल- २ चा पहिला टप्पा 25 दशलक्ष प्रवाशांना सामावून घेण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे. खरे तरी या टर्मिनलचे सौंदर्य पाहून तेथे येणारे प्रवासी देखील अचंबित होऊन जातात. आज याच विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळाचा मान मिळाला आहे.