हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा बांगलादेश मधील हिंसाचार (Bangladesh Violence) सुरूच आहे. हिंसाखोर आंदोलनाकर्त्याकडून खास करून हिंदू नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. बांगलादेश मधील हिंदूंवर अत्याचार करण्यात येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आंदोलनकर्त्यांकडून अनेक ठिकाणी हिंदूंची घरे आणि मंदिरे उध्वस्त करण्यात आली आहेत. या एकूण सर्व घटनांमुळे बांगलादेशमधील हिंदू भयभीत झाला आहे. बांगलादेश मधील हिंदूंच्या छळाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जुन्या घटना ताज्या झाल्यात. यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे बांगलादेश मधील हिंदूंना त्रास सहन करावा लागला होता. फाळणीच्या आसपासच्या अशांत घटनांमुळे बांगलादेशातून लाखो लोक विस्थापित झाले, या नागरिकांनी शेजारीच असलेल्या पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय यांसारख्या भारतीय राज्यांमध्ये आश्रय घेतला होता. आपलं जीवन पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी त्यांनी भारतचा रस्ता धरला होता, मात्र त्यांच्यावर निर्वासितचा शिक्का बसला तो कायमचाच….. आज अनेक दशकांनंतर, बांगलादेशात अराजकता माजली आहे. हिंसाचाराच्या घटनांनी बांगलादेशमधील हिंदूंना असुरक्षित वाटतय. शेजारच्या देशात असलेल्या आपल्याचा भावंडांच्या या वेदना पाहून पश्चिम बंगाल मधील हिंदू चिंता व्यक्त करत आहेत आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आग्रह करत आहेत.
वेदनादायक भूतकाळाच्या आठवणी
या एकूण सर्व घडामोडीनंतर वनइंडियाने भूतकाळातील अत्याचारांचे साक्षीदार असलेल्या अनेक बंगाली हिंदूंशी संवाद साधला. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून तुम्हीही कल्पना करू शकाल कि सध्या बांगलादेशामधील हिंदूंवर काय आपबिती आली आहे. याबाबत 1971 मध्ये भारतात पळून आलेल्या सुशील गंगोपाध्याय यांनी बांगलादेशातील नोआखली जिल्ह्यातील त्यांच्या सुरुवातीच्या काळातील समृद्ध जीवनाची आठवण करून देत त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, आमचं कुटुंब मोठं होतं आणि आमच्याकडे जमीनजुमलाही जास्त होता. मात्र मुक्तियुद्धादरम्यान, पाकिस्तानी सैन्य आणि रझाकारांनी आमच्यावर हल्ला केला. आमची घरे जाळली गेली आणि अनेकांना क्रूरपणे ठार मारण्यात आले. हे सांगताना सुशील यांचे डोळे पाण्याने भरले. ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर थोड्या वेळाने परतल्यानंतर, बहुसंख्य समाजाच्या सततच्या त्रासामुळे त्यांना बांगलादेश सोडून भारतात कायमचा आश्रय घेण्यास भाग पाडले.
सध्या बांगलादेश मधील हिंदूंवर जे काही संकट ओढवलं आहे त्यावर सुशीलने तीव्र संताप व्यक्त केला. बांगलादेशमध्ये आत्ता जे काही चाललंय, हिंदूंवर जो काही अत्याचार होतोय ते पाहून हृदय पिळवटून जाते. एका गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारल्याचे फुटेज मी पाहिलेय, अशा प्रकारची क्रूरता अकल्पनीय आहे. एक भारतीय म्हणून, मी त्यांच्या सुटकेची मागणी करतो. आमच्या मूळ बांधवांवर जर हिंदूंशी गैरवर्तन होत राहिले तर आम्हाला बांगलादेशात ‘छोडो भारत’ आंदोलनाचा विचार करावा लागेल असा इशाराही सुशील यांनी दिला. सुशील यांनी यावेळी १९७१ च्या त्यांच्या कटू आठवणींना सुद्धा उजाळा दिला. ते म्हणाले , त्यावेळी मी फक्त 10 किंवा 12 वर्षांचा होतो, रझाकारांनी आमच्यावर अत्याचार केले, पुरुषांचे मृतदेह नदीत फेकले आणि आमच्या माता- बहिणींवर अत्याचार केला, अनेक महिलांचा पाकिस्तानी सैन्याने गर्भपात केला. इतक्या वर्षांनंतरही त्या जखमा अजूनही कायम आहेत.
अशीच एक हृदय पिळवळून टाकणारी गोष्ट आहे अनिमा दास यांची… अनिमा दास या जेव्हा बांगलादेश मधून पळून भारतात आल्या त्यावेळी त्या गर्भवती होत्या. त्या त्रासदायक दिवसांची आठवण करून देताना अनिमा दास म्हणाल्या, “माझा एक मुलगा तरुण होता, आणि माझी मुलगी माझ्या पोटात वाढत होती. देश संघर्षात बुडाला होता, घरे जाळली गेली होती. भीतीपोटी माझ्या सासरच्यांनी आम्हाला भारतात पाठवले. विशेषतः पुरुषांविरुद्ध व्यापक हिंसाचार पाहण्याच्या आघाताने तिच्यावर अमिट छाप सोडली आहे. या घटनेनंतर अनेकवेळा मी बांगलादेशला भेट दिली आहे मात्र तेथे पुन्हा राहण्याचा विचार मला सहन होत नाही अशा भावना अनिमा दास यांनी व्यक्त केल्या.
सुशील गंगोपाध्याय आणि अनिमा दास यांच्यासारख्याच भावना सीमावर्ती भागातील अनेकांनी व्यक्त केल्या. त्यावेळी अनेकांनी आपली वडिलोपार्जित घरे आणि आठवणी सोडून धार्मिक छळातून पळ काढला होता. आज भलेही त्यांना भारतात विस्थापित म्हणून राहावं लागत असेल पण भारतात मिळत असलेल्या सुरक्षिततेमुळे त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. बांगलादेशातील हिंदूंना त्यांनी हाच एक सल्ला दिला आहे कि तुम्ही भारतात आश्रय घ्या.
यावेळी वन इंडियाने हरधन बिस्वास यांच्याशीही संवाद साधला, ज्यांचे वडील बांगलादेशातून भारतात स्थलांतरित झाले होते. ते म्हणाले, त्यावेळी सततच्या छळामुळे हिंदू समाज हा घाबरलेला होता, त्यामुळे अनेकांनी मायदेशी भारतात जाऊन आश्रय घेतला. बांगलादेशात स्वातंत्र्याच्या काळापासून ते मुक्तिसंग्रामापर्यंत आणि त्यांच्यानंतरही हिंदूंनी अनेक आव्हानांचा सामना केला आहे. तरीही या सर्व आव्हानांचा आणि धोक्याचा सामना करत अनेकांनी बांगलादेशात राहणे पसंत केलं. 1956 मध्ये भारतात आलेल्या परेश दास यांनी वन इंडियाशी बोलताना एक त्रासदायक अनुभव सांगितला. “माझ्या आजोबांचा माझ्या डोळ्यासमोर हल्ला करून खून करण्यात आला. आम्ही भीतीपोटी आमची जमीन सोडून दिली. त्यांनी माझ्या समोरच माझ्या चुलत भावावर सुद्धा प्राणघातक हल्ला केला. आम्ही सध्या भारतात शांततेत राहत असलो, तरी नोआखलीतील आमच्या नातेवाईकांना अजूनही धमक्यांचा सामना करावा लागत आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी जमिनीच्या वादातून माझ्या काकांची हत्या झाली होती, मी त्यांना संपत्तीपेक्षा त्यांच्या जीवनाला प्राधान्य देण्यास सांगितले होते असं परेश दास यांनी सांगितलं.
हस्तक्षेपाची विनंती
न्यूटाऊनजवळ राहणारे रशोमोय बिस्वास यांनी 1971 नंतरच्या हिंदूंवरील छळांची आठवण ताजी करून दिली. हिंदू असणे हा गुन्हा होता. स्वातंत्र्यानंतरही आम्हाला दिलासा मिळाला नाही. त्यावेळी पाकिस्तानी लष्कर आणि जमातच्या सैन्याने आम्हाला लक्ष्य केले, हिंदूंच्या घरांवर हल्ले केले. ते पुढे म्हणाले, माझ्या कुटुंबाने अनेकदा अन्न न खाता लपून छपून रात्र काढली. सध्या आम्ही भारतात शांततेत आणि सुखाने राहतोय हे खरय, पण आमचे अनेक नातेवाईक बांगलादेशात राहत आहेत. त्यामुळे तेथील हिंदू निर्भयपणे जगत आहेत का याची खात्री करण्यासाठी भारत सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती करतो असं त्यांनी म्हंटल.