हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामतीची लोकसभा निवडणूक इंटरेस्टिंग ठरली… पहिल्यांदाच पवार कुटुंबात फूट पडून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली… उभ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या या मतदारसंघाची निवडणूक घासून होईल, असा अंदाज होता… पण खडकवासला वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी जोरदार तुतारी वाजवली… त्यामुळे लोकसभे पाठोपाठ आता विधानसभेला या सहा विधानसभा मतदारसंघांचा निकाल कसा लागेल? अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दत्ता भरणे, राहुल कुल, विजय बापू शिवतारे अशा एक ना अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचं राजकारण येणाऱ्या विधानसभेला ठरणार आहे… त्यामुळे बारामती पासून ते शहरात मिसळलेल्या खडकवासला पर्यंत… आणि दौंडपासून ते दुष्काळी पुरंदर पर्यंत… आमदारकीचा निकाल कसा लागतोय? बारामती लोकसभेतून यंदा कोणते सहा आमदार विजयाचा गुलाल कपाळाला लावतील? त्याचंच हे राजकीय विश्लेषण…
यातला पहिला मतदार संघ येतो तो अर्थातच बारामतीचा… लोकसभेला सुनेत्रा पवार यांचा दारून पराभव झाल्यानंतर यंदा विधानसभेला दस्तुरखुद्द अजित पवार यांचीच आमदारकी टांगणीला लागलेली आहे… आपल्याच मतदारसंघातून तब्बल 48 हजारांचं लीड सुप्रिया ताईंना मिळाल्याने येणाऱ्या विधानसभेला अजितदादांचीच आमदारकी धोक्यात आहे… शरद पवारानंतर बारामतीच्या आमदारकीची धुरा संपूर्णपणे अजित दादांच्या कंट्रोलमध्ये आली… सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत बारामती मतदारसंघात तसा पाहायला गेला, तर अजित दादांचा होल्ड आहे… मात्र विधानसभेला सत्तेच्या चाव्या फिरवून शरद पवारांनी आपली ताकद दाखवून दिली… त्यात अजितदादांना टक्कर देण्यासाठी युगेंद्र पवार यांना ताकद द्यायला शरद पवारांनी सुरुवातही केली आहे… त्यामुळे पवार विरुद्ध पवार… अजित दादा विरुद्ध युगेंद्र दादा.. घड्याळ विरुद्ध तुतारी… असा अटीतटीचा सामना येणाऱ्या विधानसभेला पाहायला मिळेल… लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये वास्तविक पाहता फार अंतर असतं… पण लोकसभेचा निकाल एज इट इज कायम राहिला तर अजितदादांना इतिहासात पहिल्यांदाच आपल्याच घरातून पराभवाचा धक्का बसू शकतो…
दुसरा मतदार संघ येतो तो इंदापूरचा.. हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे… अशी इथली अटीतटीची लढत… प्रस्थापित असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना सलग दोन टर्म पराभवाचा दणका देत राष्ट्रवादीचे दत्ता भरणे इथून आमदार झाले… पण भरणे दादांच्या सोबत आल्याने एकमेकांचे हे दोन प्रतिस्पर्धी आता महायुतीच्या एकाच छताखाली आले आहेत… त्यामुळे भरणे किंवा पाटील या दोघांपैकी एकाला उमेदवारीसाठी बंड करावं लागणार आहे… त्यात हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील, दत्ता भरणे आणि प्रवीण माने हे ही इच्छुक असल्याने आणि त्यात लोकसभेला लीड मायनसमध्ये असल्याने यांपैकी एक जण शरद पवार गटात जाण्याचा अनपेक्षित निर्णय घेऊ शकतो… त्यात तुतारीकडून आप्पासाहेब जगदाळे यांच्या नावाचीही चर्चा असल्याने सध्या तरी तुतारीच्या चिन्हावर जो लढणार, तो प्लस मध्ये राहणार, असं इंदापूरचं राजकीय वातावरण आहे…
तिसरा मतदारसंघ येतो तो दौंडचा… इंदापूर प्रमाणे दौंड मध्येही राहुल कुल विरुद्ध रमेश आप्पा थोरात अशी काट्याने काटा काढावा, अशी अटीतटीची लढत असते… मात्र मागील दोन्ही टर्मला थोरातांना पाणी पाजून राहुल कुल यांनी आपल्या वर्चस्वाचं राजकारण कायम राखलय… थोरातांनी यंदाही आमदारकीची कसून तयारी केलेली असताना अचानक अजित दादांसोबत तेही महायुतीचा भाग झाल्याने थोरातांना येणाऱ्या विधानसभेला बंड करण्याशिवाय पर्याय नाही… मात्र शरद पवार गटाकडून आप्पासाहेब पवार यांचंही नाव चर्चेत असल्याने इथे तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे… पण रमेश आप्पांनी शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली, तर दौंडचा निकाल पलटण्याची शक्यता आहे…
चौथा मतदारसंघ येतो तो पुरंदरचा.. इथले विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे संजय जगताप… विजय बापू राज्यमंत्रीपदावर असताना आणि त्यांचा एक ओरा असतानाही 2019 ला शिवतारेंना चितपट करत जगताप आमदार झाले… यानंतर शिवतारेंचा राजकीय डाऊन फॉल सुरू झाला… त्यात शिंदे गटात जाणं, लोकसभेला ताकद दाखवण्याची भाषा करून पुन्हा म्यान केलेले तलवार… या सगळ्यांमुळे शिवतारेंनी आपल्या राजकीय क्रेडिबिलिटी वरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय… त्यात संजय जगतापांनी लोकसभेला सुप्रियाताईंचे प्रामाणिक काम केल्यामुळे याची पोचपावती शरद पवार गटाकडून विधानसभेला जगतापांना होऊ शकते.. त्यामुळे पुरंदरात जगताप पुन्हा… अशी सध्या राजकीय स्थिती आहे…
पाचवा मतदारसंघ भोरचा… काँग्रेसचे संग्राम थोपटे या मतदारसंघाचे अनबीटेबल आमदार… संस्थात्मक राजकारणाचे जाळ, कारखानदारी आणि शिक्षण संस्था हे तगड असल्याने थोपटेंना इथं हरवण तशी अवघड बाब… लोकसभेलाही युतीधर्म पाळत त्यांनी तुतारीच्या बाजूने मोठे लीड दिलय… त्यामुळे इथं पुन्हा एकदा संग्राम थोपटे च निवडून येतील, अशी परिस्थिती आहे… दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाकडून विक्रम खुटवत, कुलदीप कोंडे, किरण दगडे पाटील हे इच्छुक असले तरी जगतापच इथून सध्या तरी प्लस मध्ये दिसतायेत…
शेवटचा आणि सहावा मतदारसंघ येतो तो खडकवासल्याचा… बारामती लोकसभेतील खडकवासला हा भाजपचा एकमेव मतदार संघ… भाजपचे भीमराव तापकीर इथून विद्यमान आमदार आहेत… लोकसभेला हडपसरमधून भाजपाला मिळालेले लीड पाहता यंदाही कमळाच्याच उमेदवाराचं पारडं मतदार संघात जड आहे… पण स्टॅंडिंग आमदार भीमराव तापकीर यांच्यासोबतच रमेश कोंडे, सचिन दोडके, रूपाली चाकणकर यांचीही उमेदवारीसाठी नाव चर्चेत असल्याने महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर परिस्थिती मविआच्या पथ्यावर पडू शकते… त्यात वसंत मोरे यांनी नुकतंच ठाकरेंचं शिवबंधन हाती बांधल्याने खडकवासला विधानसभेची निवडणूक इंटरेस्टिंग वळणावर जाऊन पोहोचलीय…तर असा होता बारामती लोकसभा मतदारसंघातील या सहा विधानसभा मतदारसंघांचा राजकीय आढावा… लोकसभेला तर बारामतीने तुतारीच्या बाजूने कौल दिलाय… आता मात्र विधानसभेला जनता कुणाच्या बाजूने निकाल देतेय? ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे… या सहा विधानसभा मतदारसंघाबाबत तुमचं काही मत असेल, तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…