नवी दिल्ली । TRP घोटाळा समोर आल्यानं ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलनं (BARC) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील ३ महिने टीआरपी रेटिंग स्थगित करण्याचा निर्णय बार्कनं जाहीर केला आहे. मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात टीआरपी घोटाळा उघडकीस आणला. यामध्ये रिपब्लिक टीव्ही आणि इतर दोन मराठी वाहिन्यांची नावं समोर आली होती. (TRP Scam)
मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात TRP मोजणाऱ्या यंत्रणेशी छेडछाड करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. प्रेक्षकांना कोणते कार्यक्रम आवडतात, कुठल्या वाहिन्या कोणत्या वेळी किती कालावधीसाठी पाहिल्या जातात, याची माहिती टीआरपीमधून मिळते. टीआरपी मोजण्याचं काम बार्क करतं. त्यासाठी काही प्रेक्षकांच्या घरी एक मीटर लावलेले असतात. मात्र याच मीटरसोबत छेडछाड करण्यात आली. ज्यांच्या घरात मीटर लावण्यात आले होते, त्यांना पैसे देऊन विशिष्ट चॅनेल दिवसभर पाहण्यास सांगितली गेली, असं मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आलं.
रिपब्लिक टीव्हीनं (Republic Tv)अधिक टीआरपी मिळवण्यासाठी काही जणांना पैसे दिले, असा आरोप मुंबई पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन मराठी वाहिन्यांच्या मालकांना अटक केली. याच पार्श्वभूमीवर बार्कनं १२ आठवड्यांसाठी TRP रेटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशननं (NBA) बार्कच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र बार्कनं हा निर्णय घेताना एनबीएशी सल्लामसलत करायला हवी होती, असं एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”