…आणि बार्टी संस्थेनं ५०० बेघरांना रोज जेवण पुरवण्याचा निर्णय घेतला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लढा कोरोनाशी | कुणाल शिरसाठे

कोरोना विषाणूंचा सामूहिक फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक-एक करून पाऊले उचलली आणि देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संचारबंदीची घोषणा केली. घराच्या बाहेर पडायचे नाही, सर्व कामे ठप्प आणि ज्यांचे पोट हातावर आहे त्यांचे तर जगणंच ठप्प. पण हे संकट जास्त वाढू द्यायचे नसेल तर ही पाऊले आपण टाकली पाहिजे… मग अश्याप्रकारे हातावर पोट असणाऱ्यांचे काय? त्यांच्या भुकेचा प्रश्न कसा सोडवायचा?

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी हे संकट सुरू झाले तेव्हा सांगितले होते की, सर्व वंचितांच्या सोबत सामाजिक न्याय विभाग उभा राहील, त्यालाच अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेचे महासंचालक श्री.कैलास कणसे यांनी बार्टी ही पुणे शहरातील पुणे स्टेशन, हडपसर, शिवाजीनगर, मनपा परिसर, डेक्कन व नदी पात्रात राहणाऱ्या ५०० बेघर, गरीब व मजुरीचे काम करणाऱ्या लोकांना रोज जेवण पुरवेल असा निर्णय घेतला. याला सगळ्या बार्टी मधील अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

मागील दोन दिवसांपासून दि.१४ एप्रिल पर्यंत रोज ५०० बेघरांना जेवण देण्यासाठी तीन गाड्यांची व्यवस्था करण्यात आली, अधिकारी व कर्मचारी स्वतःहून पुढे येऊन हे काम करू लागले. दररोज जेवणाची गुणवत्ता तपासली जाते, डबे तयार करून ते विविध भागात पोहचवले जातात…. एका ट्रे मध्ये सगळे डबे ठेवून गरजवंतांनी एक मीटर अंतर ठेवून रांगेत उभे रहावे,डबा व पाणी घ्यावे आणि जेवण करावे असा हा क्रम सुरू झाला आहे. दरम्यान सगळ्यांना काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती देखील आम्ही देतोय.

आम्ही जेव्हा या लोकांना भेटतो तेव्हा यांची सविस्तर चौकशी करतो. ते कुठे राहतात? पुण्यात कसे आले? काम काय करता? यातून एक आपुलकी निर्माण झाली आहे. दिलेल्या वेळेत हे लोक जेवण घेऊन येणार याची खात्री देखील त्यांना झाली आहे. काल एका ठरलेल्या ठिकाणी जेवण वाटपासाठी गेलो… तेवढ्यात एक मावशी रस्त्याच्या कडेला असलेल्या त्यांच्या झोपडीतून बाहेर आल्या त्यांना विचारलं “जेवल्या का मावशी”
“हो बाबा जेवले”
“जेवण आणलं होतं, रात्रीसाठी ठेवता का?”
“नको बाबा, दुपारचं आहे ते लय आहे, उगी तुझ्याकडून घेऊन फेकून कशाला द्यायच, ते पुढल्या चौकात नाही मिळलं कोणाला तिकडं दे”

काळजीने दोन-दोन तीन-तीन महिन्याचा किराणा भरून ठेवणाऱ्या लोकांच्या रांगा माझ्या डोळ्यासमोर आल्या… अगदी प्रामाणिकपणे मला आज नको उद्या घेऊन ये अस त्या आजीनी सांगितलं…

तुकाराम चित्रपटातील एक संवाद मला यावेळी आठवला ‘संकट आलं की पहिले मरते ती माणुसकी’ पण इकडे मात्र वेगळं चित्र होत

अश्या संकटकाळी एका बाजूला स्वार्थी होणारी लोकही आहेत तर दुसऱ्या बाजूला पोटातील भूक क्षमवली की प्रामाणिकपणे इतरांचा देखील विचार करण्याची भावना आहे… समाजाच्या या दोन्ही बाजूंपैकी आपण कुठे आहोत?

रस्त्याच्या कडेला राहणारे हे सगळे लोक मजुरी करणारे आहेत, त्यातील काही उत्तर प्रदेश,बिहार,झारखंड मधील हे मजूर आहेत तर काही सोलापूर, उस्मानाबाद, परभणी, बीड मधील मजूर आहेत, यात भटक्या जातीतील लोकांची संख्या मोठी आहे. काही स्वयंसेवी संस्था मास्क वाटप करीत आहेत, पण या ठिकाणी जेवनांनंतर अजून कसली गरज असेल तर ती साबण वाटप करण्याची जेणेकरून किमान स्वच्छता ते ठेवू शकतील. सगळ्या रस्त्यावरील झोपड्यामध्ये मला माणुसकी दिसून आली, ही माणसं जीव मुठीत धरून असली तरी माणुसकी जपून आहेत… इथे ते एकमेकांना धर्म विचारीत नाहीत जात विचारीत नाहीत.

या झोपड्यांमध्ये लहान मुले खूप आहेत, जेवण आलं की मोठी झुंबड मुलं उडवत होती… जेवण वाटून झाल्यावर एक डोकं बांधलेली छोटीशी मुलगी माझ्याजवळ आली. ती काहीच बोलेना म्हणून तिला विचारलं काय हवंय बेटा जेवण घेतलं का?
“नहीं चाचा खाना है मेरे पास पाणी चाहीये एक बॉटल… सुबह से पाणी नही मिला….” मी आतून हलून गेलो… तिच्या हातात दोन तीन पाण्याच्या बाटल्या दिल्या… तर ती पोर म्हणाली “कल रात तक चल जायेगा कल फिर आप आयोगे ना?”

लोक रस्त्यावर कशी राहतात,जगतात याचा अंदाज आपण आपल्या घरात बसून लावू शकणार नाही. आपण या जगापासून कोसो दूर आहोत. बाल हक्क, जेवण आणि पाण्याचा हक्क, चांगलं राहण्याचा हक्क, एकूणच काय चांगलं जीवन जगण्याचा हक्क आपण या लोकांना देऊ शकू काय? असे अनेक प्रश्न माझ्या मनात या मोहिमेत असल्यापासून येत आहेत. हे संकट माणुसकी संपलेली नाही याची खात्री या लोकांना देऊ शकेल काय? हा माझ्यासाठी कळीचा प्रश्न बनला आहे.

कुणाल शिरसाठे
9767599934
(सहा.प्रकल्प संचालक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे)

Leave a Comment