बार्टी, सारथी, महाज्योती पेपरफुटी!! संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये पेपर फुटीचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. कारण आज पुन्हा एकदा पेपरफुटी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बार्टी, सारथी, महाज्योती CET पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला आहे. यावर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेवरच बहिष्कार टाकला आहे. तसेच पुण्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आज पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रांवर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येणाऱ्या पात्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका झेरॉक्स देण्यात आल्या होत्या. मात्र देण्यात आलेल्या सी आणि डी या प्रश्नपत्रिका सील नसल्याचे निदर्शनात आल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच परीक्षेवरच बहिष्कार टाकला. यामुळे अनेक परीक्षा केंद्रांवर तणावाचे वातावरण निर्माण झाले. यात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचे देखील दिसून आले.

राज्यामध्ये महत्त्वाच्या होणाऱ्या परीक्षांमध्येच पुन्हा एकदा पेपरफुटी झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी सरसकट आम्हाला फेलोशिप द्या अशी मागणी केली आहे. तसेच, आम्ही परीक्षा देत बसू का संशोधन करू असा प्रश्न देखील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. सध्या या सर्व घडलेल्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांकडून पेपर फुटीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता सरकार या सर्व प्रकारावर काय भूमिका घेते याकडे विद्यार्थ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.