केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली तरीही काहीही फरक पडत नाही : बसवराज बोम्मई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद काही केल्या थांबताना दिसत नाही. या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी काल महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनीही याप्रकरणी मध्यस्थी करू असे सांगितले. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडत नाही. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही, असे बोम्मई यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल भेट घेतल्यानंतर सोमवारी कर्नाटकचे खासदार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. राज्याची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी बोम्मईही लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, यासंबधी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट केले. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी फोनवरुन चर्चा केली आहे, दोन्ही राज्यामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे यावर आम्ही दोघांचेही एकमत झाले आहे.

ट्विटनंतर बोम्मई यांनी टीकाही केली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरुन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांशी बोलणे झाले आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच, याप्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले आहे.