देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती देवमाणूस आहे.., धक्काबुक्कीच्या आरोपांवर बावनकुळेंचं भाष्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नागपूरमध्ये पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका व्यक्तीला धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधकांकडून लावला जात आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी धक्काबुक्कीचा व्हिडिओ पोस्ट करत आरोप करण्याऱ्या विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. तसेच, ‘देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती देवमाणूस आहे, या देवमाणसावर केलेले खोटे आरोप जास्त काळ टिकत नाहीत” असे म्हणले आहे.

विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांवर लावलेल्या आरोपांविषयी भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, “नागपूरमधील पूरस्थितीचे पाहणी करण्यासाठी गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी एका नागरिकाचा हात ओढला असा आरोप विरोधकांकडून लावला जात आहे. या संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल केला होता. मात्र आता वस्तूस्थिती समोर आली आहे. त्या संबंधित व्यक्तीने स्वत:हून समोर येत या विषयातील वस्तूस्थिती आज जनतेसमोर कथन केली आहे.”

“या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती म्हणताना दिसत आहे की, देवेंद्र फडणवीस आमच्या भागात पूर परिस्थितीच्या पाहण्यासाठी आले होते. यावेळी नागरिकांशी ते चर्चा करीत असताना गर्दीमुळे सुरक्षारक्षक आणि पोलीस मला फडणवीस यांच्यापर्यंत पोहचू देत नव्हते. ही गोष्ट फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी माझा हात धरला आणि चल बाबा मी तुझ्या घरी येतो असे म्हणत मला ते माझ्या घरी पाहणी करायला घेऊन गेले” अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.

त्याचबरोबर पुढे बोलताना, “आता स्वतः या नागरिकानेच वस्तूस्थिती समोर आणल्याने कालपासून कोल्हेकुई करणारे विरोधक आणि त्यांची भाडोत्री ट्रोलर्स मंडळी तोंडावर आपटली आहेत. ‘सत्य अस्वस्थ होईल, पण पराभूत होत नाही’ या उक्तीचे यानिमित्ताने प्रत्यंतर आले आहे. देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती देवमाणूस आहे. या देवमाणसावर केलेले खोटे आरोप जास्त काळ टिकत नाहीत. त्यांचे विरोधक तोंडघशी पडतात हा अनुभवही यानिमित्ताने आला असेल” अशा शब्दात बावनकुळे यांनी विरोधकांना सुनावले आहे.