हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Beautiful Train Routes) लहानपणी प्रवासादरम्यान ‘मलाच विंडो सीट हवी’ असं म्हणून तुम्हीही आपल्या भावंडांसोबत नक्कीच भांडला असाल. त्यात रेल्वेच्या खिडकीतून दिसणारी झाडी, छोटे मोठे धबधबे, खळखळून वाहणाऱ्या नद्या पाहण्याची मजा काही औरच!! रेल्वेच्या खिडकीतून डोकावून पाहताना हि सारी दृश्य गतीने मागे पळताना दिसतात. त्यामुळे आणखीच मजा येते. असा हा मजेशीर प्रवास वारंवार घडावा असे प्रत्येकाला वाटते. आज प्रवासासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र रेल्वेच्या प्रवासातील मजा इतर कुठेच नाही. अशातच आज आपण अशा काही रेल्वेमार्गांची माहिती घेणार आहोत ज्यावरून प्रवासादरम्यान दिसणारी मनोहक दृश्य डोळ्यात साठवता येतात
(Beautiful Train Routes) झुक झुक करत चालणारी रेल्वे गाडी मनमोहक प्रवास घडवू शकते याचा प्रत्यय देणारे हे महामार्ग आपल्या भारतात आहेत. होय. आपल्या देशातील काही रेल्वे प्रवास इतके सुंदर आहेत की तुम्हाला क्षणभर तिथेच विसावून जावे असे वाटेल. आज त्यापैकीच काही रेल्वे मार्गांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे मार्ग केवळ नेत्रदीपक दृश्यांसाठी नव्हे तर बांधकाम शास्त्राचे अजोड नमुने म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत.
1) कोकण रेल्वे
येवा कोकण आपलोच असा.. म्हटल्यावर पुन्हा पुन्हा कोकणवारी करावी असं हे ठिकाण. कोकणात जाण्यासाठी रत्नागिरी- मडगाव- होनावर- मंगलोर असा रेल्वे प्रवास केला आहात का..? केला नसाल तर जरूर करा. (Beautiful Train Routes) कारण, कोकण रेल्वेचा हा मार्ग भारतातील सर्वात प्रसिद्ध रेल्वेमार्ग आहे. या प्रवासादरम्यान तुम्हाला अत्यंत अद्भुत आणि अलौकिक अशा निसर्ग सौंदर्याची भुरळ पडेल. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, नदीवरील लाडकी पूल, छोटे छोटे तलाव, नारळ- सुपारीची हवेत डोलणारी झाडे तुमच्या मनाला अगदी स्पर्श करून जातात.
2) गोवा रेल्वे
पर्यटनासाठी गोवा अत्यंत प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी दिसते. गोव्याचा सुंदर परिसर मनमोहक आहे. शिवाय गोव्याला जाताना वास्को द गामा – लोंदा असा रेल्वे प्रवास केल्यास तुम्ही निसर्गाच्या प्रेमात पडाल. कारण पांढरे शुभ्र खळखळणारे धबधबे रेल्वेच्या खिडकीतून पाहणे म्हणजे स्वर्गसुख म्हणावे लागेल. (Beautiful Train Routes) गोव्यापासून कर्नाटक आणि परत कर्नाटक ते गोवा असा हा रेल्वे प्रवास तुमच्या आयुष्यातील सुंदर अनुभव देईल. पावसाळ्यात तर हि दृश्य आणखीच मनोवेधक ठरतात.
3) केरळ समुद्रालगतची रेल्वे
केरळला देवभूमी असे उगाच म्हणत नाहीत. इथले नैसर्गिक सौंदर्य आणि इतिहास तुम्हाला निःशब्द करून सोडणारा आहे. शिवाय अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळून जाणारा एर्नाकुलम- कोल्लम – त्रिवेंद्रम हा रेल्वेमार्ग तुम्हाला कधीच संपू नये इतकी भुरळ घालतो. समुद्राचे दूरवर पसरलेले पाणी, नारळाची उंच उंच झाडे, हिरवीगार शेतीची दृश्ये तुमच्या मला प्रफुल्लित करतील.
4) काश्मीर व्हॅली रेल्वे
काश्मीरचा सुंदर परिसर हा नेहमीच निसर्ग प्रेमींना पुकारत असतो. त्यामुळे पर्यटनासाठी काश्मीर सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. काश्मिर रेल्वे ही भारतातील निसर्गरम्य रेल्वेमार्गापैकी एक असून जम्मू- उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला असा रेल्वेप्रवास अत्यंत आनंददायी आहे. तब्बल २० बोगदे आणि १०० पूल एकत्र जोडून तयार केलेला काश्मीर रेल्वेमार्ग हा आव्हानात्मक रेल्वेमार्ग म्हणून प्रसिद्ध असून बर्फाळ पर्वतांमध्ये बांधला गेला आहे. त्यामुळे हा प्रवास आल्हाददायी आणि प्रसन्न करणारा आहे. (Beautiful Train Routes)
5) आसाम रेल्वे
आसामचं नाव घेतलं कि डोळ्यासमोर पहिलं दृश्य येतं ते चहाच्या इवल्या इवल्या रोपट्यांचं. आसाममध्ये चहाच्या झाडांच्या बागा आहेत हे आपण जाणतो. पण या बागांचे सौंदर्य दुरून न्याहाळायचे असेल तर गुवाहाटी- लवडींग- सिलचर असा रेल्वे प्रवास जरूर करा. चहाच्या झाडांच्या बागा, खोल दऱ्या, डोंगर रांगा आणि नद्यांचे सुंदर दृश्य या रेल्वे प्रवासात अनुभवता येते.