हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शेती हा केवळ जगण्यासाठीचा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी सोनं आहे. शेतामध्ये चांगले पीक पिकवून शेतकरी लखपती किंवा करोडपती होऊ शकतात. शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट करणाऱ्या पिकांमध्ये महत्त्वाचे पीक आहे ते म्हणजे बीट (Beetroot). गुजरातमधील भावनगर येथील पोपटभाई, उत्तर प्रदेशातील हाजी चौधरी आणि रामपूरमधील बनवारीलाल सैनी या शेतकऱ्यांनी बीटची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवले आहे.
दोन महिन्यांत लाखोंचे उत्पन्न
शेतकरी पोपटभाई सांगतात की, त्यांनी अनेक वर्षांपासून कोणतेही रासायनिक खत न वापरता बीटची लागवड केली आहे आणि त्यातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. अवघ्या एका बिघा जमिनीत त्यांनी बीटचे उत्पादन घेऊन दोन महिन्यांत 1.50 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले आहे. बीट पीक केवळ 60 दिवसांत बाजारात विक्रीसाठी तयार होते, त्यामुळे हे कमी वेळात नफा देणारे पीक मानले जाते.
बाजारात बीटची मोठी मागणी
बीट हे कंद वर्गातील पीक असून ते विविध प्रकारे वापरले जाते. याचा उपयोग भाजी, सूप, सॅलड आणि रस बनवण्यासाठी होतो. तसेच, बीटमध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि व्हिटॅमिन बी 9 भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
बीटचे औषधी गुणधर्म लक्षात घेता ते आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील वापरले जाते. याशिवाय, बीटचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी देखील होतो. त्यामुळे बाजारात या पिकाला नेहमी मागणी असते आणि शेतकऱ्यांना हमखास चांगला दर मिळतो.
बीट लागवडीसाठी योग्य वेळ आणि जमिन
शेतकरी कोणत्याही ऋतूत बीट लागवड करू शकतात. मात्र, भारतात सप्टेंबर ते मार्च हा कालावधी बीट लागवडीसाठी सर्वोत्तम मानला जातो. यासाठी चिकणमाती मिश्रित वालुकामय जमीन चांगली ठरते. तसेच, मातीचे pH मूल्य 6 ते 7 च्या दरम्यान असणे आवश्यक असते.
बीटच्या चांगल्या उत्पादनासाठी अर्ली वंडर, डेट्रॉईट डार्क रेड, क्रॉस्बी ऑफ इजिप्त, क्रिमसन ग्लोब, रोमन्सकाया, रुबी क्वीन आणि एमएसएच 102 या जाती शेतकरी निवडू शकतात. योग्य जातीच्या बियाण्यांची निवड केल्यास उत्पादन वाढते आणि नफा अधिक मिळतो.
दरम्यान, पारंपरिक गहू आणि भाताच्या शेतीपेक्षा बीटसारखी बहुपयोगी आणि उच्च मागणी असलेली पिके घेणे फायदेशीर ठरू शकते. कमी खर्च, कमी मेहनत आणि जलद परतावा यामुळे बीट लागवड शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य देणारी ठरत आहे.