हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) RTGS आणि NEFT व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांना RTGS आणि NEFT द्वारे पैसे पाठवताना लाभार्थ्याचे नाव स्क्रीनवर दिसणार आहे. यामुळे चुकीच्या खात्यात पैसे पाठवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे चुकीच्या कामांना आळा बसणार असून , गैरप्रकार टाळले जाणार आहेत. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
RTGS आणि NEFT –
RTGS (Real-Time Gross Settlement) आणि NEFT (National Electronic Funds Transfer) या दोन प्रमुख पेमेंट सिस्टिम्स भारतातील बँकांद्वारे निधी हस्तांतरणासाठी वापरल्या जातात. या दोन्ही प्रणाली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली कार्य करतात. RBI ने सर्व बँकांना सांगितले आहे कि , 1 एप्रिल 2025 पर्यंत ही नवी प्रणाली लागू करावी. सध्या यूपीआय आणि आयएमपीएस व्यवहारांमध्ये लाभार्थ्याचे नाव पडताळण्याची सुविधा उपलब्ध आहे. आता तीच सुविधा RTGS आणि NEFT साठीही देण्यात येणार आहे.
नवीन प्रणालीमुळे अनेक फायदे –
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही नवी प्रणाली विकसित करणार आहे . यानंतर सर्व बँका ती प्रणाली त्यांच्या इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग प्लॅटफॉर्मवर लागू करतील. बँकेच्या शाखेत जाऊन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनाही ही सुविधा मिळणार आहे. ग्राहकांना या नवीन प्रणालीमुळे अनेक फायदे होणार आहेत. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे चुकीच्या खात्यात पैसे जाण्याचे प्रकार कमी होतील. ग्राहक जेव्हा लाभार्थ्याचे नाव स्क्रीनवर दिसेल, तेव्हा ते खात्री करून योग्य लाभार्थ्याला पैसे पाठवू शकतील. यामुळे पैसे चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याचा धोका कमी होईल. त्याचसोबत , फसवणुकीचे प्रकार थांबतील, कारण ग्राहकांना पैसे पाठवण्याआधी प्रत्येक तपशीलाची तपासणी करता येईल, ज्यामुळे फसवणुकीची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे . यामुळे ग्राहकांना अधिक सुरक्षा आणि विश्वास मिळेल.