KCR यांचा पहिला दणका पवारांना!! भगीरथ भालके 27 जूनला BRS मध्ये प्रवेश करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या BRS ने महाराष्ट्रात एंट्री मारली आहे. राज्याच्या अगदी तळागाळात जाऊन बीआरएसने आपले पोस्टर्स लावलेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील BRS च्या शिरकाव्यामुळे कोणाला फटका बसणार अशा चर्चा सुरु असतानाच के. चंद्रशेखर राव यांनी पहिला दणका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले पंढरपूरचे नेते भगीरथ भालके हे 27 जून रोजी बीआरएस मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

आज पंढरपूर येथे भगीरथ भालके यांच्याकडून कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, या बैठकीनंतरच त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. 27 जून रोजी के चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला येणार आहेत. हाच मुहूर्त साधून भगीरथ भालके आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह बीआरएस मध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भगीरथ भालके यांनी हैद्राबादला जाऊन के. चंद्रशेखर राव यांची भेटही घेतली होती. त्यामुळे भालके राष्ट्रवादीची साथ सोडणार अशा चर्चा जोरदार सुरु होत्या, अखेर त्यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत आपण BRS मध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केलं.

कोण आहेत भगीरथ भालके –

भगीरथ भालके हे राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र आहेत. कोरोना काळात भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पोटनिवडणुकीत भगीरथ भालके याना उमेदवारी दिली, परंतु त्यावेळी महाविकास आघाडीने भालके यांचा जोरदार प्रचार करूनही भाजपच्या समाधान आवताडे यांनी त्यांचा पराभव केला. पराभवानंतर भालके हे पक्षात जास्त सक्रिय नव्हते. त्यातच शरद पवारांनी मागील २ महिन्यातच सोलापूरचे साखरसम्राट अभिजित पाटील याना पक्षात घेतलं आणि त्यांना ताकद देण्याचं आवाहन करत अप्रत्यक्षरित्या अभिजीत पाटील यांना पंढरपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. तेव्हापासूनच भगीरथ भालके हे राष्ट्रवादीवर नाराज होते.