INDIA आघाडीत फूट? ममता बॅनर्जींनंतर भगवंत मान यांची स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणूक जवळ आली असताना इंडिया आघाडीला दोन मोठे धक्के बसले आहेत. आजच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्षाने देखील आगामी निवडणुकीसाठी कोणतीही आघाडी करणार नसल्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती आज मुख्यमंत्री भगवंत मान ( Bhagwant Mann) यांनी दिली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका इंडिया आघाडीला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, “पंजाबमध्ये आमचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही. आम आदमी पार्टीने पंजाबमधील 13 लोकसभेच्या जागांसाठी सुमारे 40 उमेदवार निवडले आहेत. लोकसभेच्या 13 जागांसाठी पक्षाकडून उमेदवारांचे सर्वेक्षण सुरू आहे.” तसेच, आप स्वबळावर 13 लोकसभेच्या जागा जिंकू शकते, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना, “आम आदमी पार्टी लोकसभेच्या जागा 14 पर्यंत वाढवू शकते, एक जागा चंदिगडचीही आहे. चंदिगड लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा आहे. याआधी काँग्रेसने या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.”असे भगवंत मान यांनी म्हटले आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या पाठोपाठ भगवंत माने यांनी देखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे, इंडिया आघाडीत फूट पडल्यानंतर याचा थेट फायदा भाजपला होणार आहे.