हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कराड तालुक्यात यात्रांना प्रारंभ झाला आहे. यात्रेच्या निमित्ताने गावेही गजबजून जात आहेत. कुठे मनोरंजनाचे कार्यक्रम तर बैलगाडा शर्यती, जंगी कुस्त्यांचे यात्रा कमिटीतर्फे आयोजन केले जात आहेत. सातारा, सांगली, कोल्हापुरसह कर्नाटकातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कराड तालुक्यातील पाठरवाडी- तांबवे येथील श्री भैरवनाथ देवाची यात्रा उत्साहात पार पडली. यावेळी भाविकांनी ‘भैरोबाच्या नावानं चांगभलं’ चा जयघोष करीत गुलाल खोबऱ्याची उधळण केली. यावेळी सासनकाठ्याही नाचवण्यात आल्या.
कराड तालुक्यातील पाठरवाडी येथील भैरवनाथ देवाची यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात रात्रभर भाविकांनी मुक्कामी दाखल होत श्री. भैरवनाथ अन्नछत्रात आयोजित महाप्रसादाचा लाभ घेतला. शुक्रवारी पहाटे विधीवत पुजा झाल्यानंतर साडेसहाच्या सुमारास आरती झाली. त्यानंतर पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. पालखी मंदिरातून बाहेर येताच भाविकांनी भैरोबाच्या नावानं चांगभलंचा गजर करत गुलाल- खोबऱ्याची उधळण केली.
पाठरवाडीत गुलालाच्या उधळणीत भैरवनाथाची यात्रा उत्साहात pic.twitter.com/Ptz9KKOVuC
— santosh gurav (@santosh29590931) March 26, 2023
यावेळी भाविकांनी मंदिर परिसरात फटाक्यांचीही जोरदार आतिषबाजीही केली. त्यानंतर यात्रेसाठी पाठरवाडीत दाखल झालेल्या वाटेगाव, तांबवे, सोनाईचीवाडी, काले, शेरे यासह अन्य मानाच्या सासनकाठ्या आाणि पालखीचा भेटीचा सोहळा झाला. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी कराड तालुका पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा दुधभाते यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.