दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्स्पो’ मध्ये अनेक नव्या मोटारी आणि प्रवासी वाहनांचे मॉडेल्स प्रदर्शित करण्यात आली आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) कंपनीने याच वेळी आपली नव्या पिढीची ‘इलेक्ट्रिक बस’ लाँच केली आहे. या बस एका चार्जिंगमध्ये थेट 500 किमी अंतर कापू शकतात. यामुळे मुंबईहून पुणे, नाशिक, कोकणातील सावंतवाडी किंवा रत्नागिरीपर्यंत नॉनस्टॉप प्रवास शक्य होणार आहे.
इलेक्ट्रिक बसची वैशिष्ट्ये
ऑलेक्ट्राने 12-मीटर ब्लेड बॅटरी प्लॅटफॉर्म आणि 9-मीटर सिटी बससह नवीन शैलीतील 12-मीटर कोच बस सादर केल्या आहेत. या बसेस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासाठी (MSRTC) पुरवल्या जात आहेत. इ-शिवाई आणि शिवनेरी बस यामध्ये समाविष्ट असून 9-मीटर लहान बसेस टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
ब्लेड बॅटरी तंत्रज्ञान
ब्लेड बॅटरी हे तंत्रज्ञान 30% अधिक ऊर्जा साठवणूक क्षमता देते. त्यामुळे एका चार्जिंगवर 500 किमी अंतर कापणे शक्य होते. या बॅटरी हलक्या असून 5,000 हून अधिक चार्ज सायकल टिकतात. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार कठोर चाचण्या पार केलेल्या या बॅटरी आग किंवा स्फोट होण्याचा धोका टाळतात.
सुरक्षितता आणि सोयीसुविधा
या बसमध्ये अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS), GPS ट्रॅकिंग, आणि CCTV कॅमेरे यांसारख्या वैशिष्ट्यांसह उच्चस्तरीय सुरक्षितता प्रदान केली आहे. एअर सस्पेंशन, व्हीलचेअर रॅम्प यांसारख्या सुविधांमुळे या बसेस दिव्यांगस्नेही आहेत.
महाराष्ट्रासाठी महत्त्व
ऑलेक्ट्राला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे. त्यामुळे राज्यातील विविध मार्गांवर पर्यावरणपूरक आणि टिकाऊ प्रवासाची नवी वाट खुली झाली आहे. यामुळे मुंबई ते पुणे, नाशिक, रत्नागिरी आणि धुळे असा सहजसुलभ प्रवास आता एका चार्जिंगवर शक्य होणार आहे.