हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bhatghar Dam । पुणे तिथे काय उणे असं उपहासात्मकपणे बोललं जाते. मात्र आता याच असा एक प्रकार घडला आहे जो बघून तुम्हीही बोटे तोंडात घालाल. पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणाच्या परिसरातील काही ठिकाणी पाण्याला अचानक हिरवा रंग चढला आहे. धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रातील संगमनेर, माळवाडी आणि नन्हे गावांच्या लगतच्या जलसाठ्याचे पाणी हिरवं दिसत आहे. अचानक धरणाचे पाणी हिरवं झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे. परंतु धरणाचं पाणी हिरवं कसं झालं याबद्दलचं गूढ अजूनही कायम आहे.
भाटघर धरणाच्या (Bhatghar Dam) उत्तरेकडील धरणाच्या भिंतीपासून काही अंतरावर संगमनेर, माळवाडी आणि नन्हे गावांच्या लगतच्या जलसाठ्यात हे हिरवेगार पाणी दिसत आहे. या हिरव्यागार पाण्यामुळे संपूर्ण परिसर दूषित झाला असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. दूषित पाण्यामुळे भाटघर धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या काही गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खरं तर, गेल्या दोन महिन्यांपासून भाटघर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने पाणी गढूळ होऊन दूषित झाले होते. परंतु चार दिवसांपासून पाण्याचा रंग हिरवा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य धोका – Bhatghar Dam
या हिरव्या पाण्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेवर, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या परिणामकारकतेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिकांमध्ये आहे. लाखो लोक ज्या धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत त्या धरणाचं पाणी हिरवं कसं पडलं याबद्दल प्रशासनाने तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करावी, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.
नंदुरबारमध्येही हिरवं पाणी –
दरम्यान, नंदुरबारमध्येही असाच काहीसा प्रकार बघायला मिळाला. नंदुरबार मधील प्रकाशातील गोमाई नदीपात्रात केमिकल युक्त हिरवगार पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. गेल्या तीन चार दिवसापासून केमिकल युक्त पाणी येत आहे. या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीच्या वातावरण निर्माण झाला असून, शेतीसाठीही हे पाणी वापरण्याची रिस्क शेतकरी घेत नाहीत.




