दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली, कोट्यवधींचा गंडा घातला; कोणी केला गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाच्या मार्गावर असलेल्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत. दिपाली सय्यद आणि राज्यपाल यांनी अनेकांना बोगस लग्नांच्या माध्यमातून कोट्यवधींचा गंडा घातला आहे. त्यांनी अनेकांकडून कोट्यवधी रुपये हडप केले असं त्यांनी म्हंटल आहे. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी अशी मागणीही भाऊसाहेब शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे दीपाली सय्यद यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

भाऊसाहेब शिंदे म्हणाले, दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्रात दीपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हजारो कोटींची मदत केली. परंतु जेव्हा ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की, ३१ मार्च २०१८ अखेर ९ हजार १८२ रुपये त्यांच्या खात्यावर शिल्लक होते.  ९ सप्टेंबर २०२१ रोजी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली. २०१६ लग्न होऊन ज्यांना १ अपत्यही झालं अशा सुप्रिया गिरी आणि रवींद्र गिरी दाम्पत्याचे त्यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी पुन्हा एकदा बोगस लग्न लावलं.

यावेळी भाऊसाहेब शिंदे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. येत्या आठ दिवसांमध्ये दीपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून झालेली कोट्यावधी रुपयांची चौकशी आपण करावी, अन्यथा मी तुमच्या सागर बंगल्यासमोर आत्मदहन करणार आहे असे त्यांनी म्हंटल. दीपाली सय्यद यांना बोगस लग्न लावण्यात राज्यपाल सहकार्य का करतात आणि सय्यद यांच्यावर राज्यपाल मेहेरबान का आहेत याचीही चौकशी झाली पाहिजे असं भाऊसाहेब शिंदे म्हणाले.