नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांच्या वडिलांचे गुरुवारी निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांनी मेरठ येथील गंगानगर सी पॉकेट येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचे नाव किरनपाल सिंह असून ते पोलीस विभागात काम करत होते आणि त्यांनी व्हीआरएस घेतला होता.
भुवनेश्वर कुमारच्या वडिलांना यकृताचा आजार होता आणि काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी आशा सोडल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना आपल्या घरी आणले होते. त्यांच्यावर मागील काही महिन्यांपासून घरीच उपचार सुरु होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स व नॉयडातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. दिल्ली व नॉयडा येथे त्यांच्यावर किमो थेरेपीसुद्धा करण्यात आली होती. यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. पण २ आठवड्यांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली.
यानंतर त्यांना गंगानगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर त्यांना मुजफ्फरनगर येथील मसूरीमधील हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. त्यांना यकृताचा आजार होता यामुळे त्यांना कावीळ व अन्य आजरसुद्धा जडले. यानंतर मात्र डॉक्टरांनी आशा सोडली. भुवनेश्वर कुमारने 21 कसोटींत 63 विकेट्स घेतल्या आहेत. 82 धावांत 6 विकेट ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर त्याने कसोटीत 552 धावा केल्या आहेत यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 117 वन डे मध्ये 138 विकेट्स तर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 45 विकेट्स घेतल्या आहेत.