हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bibi Ka Maqbara) दिल्लीच्या आग्रा नगरातील यमुना काठी वसलेला ‘ताजमहाल’ हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानला जातो. ताजमहाल हा मोगल स्थापत्य कलेचा एक अत्यंत उत्कृष्ट असा नमुना आहे. त्याची बांधकामाची शैली आणि सौंदर्य अगदी डोळ्यात साठवून ठेवावे असे आहे. मुख्य म्हणजे, ताजमहाल हा केवळ त्याच्या सौंदर्यासाठी नव्हे तर प्रेमाचे प्रतिक म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. मुघल बादशहा शहाजान यांनी त्यांची राणी मुमताज महलच्या मृत्यू पश्चात तिच्या स्मृती प्रित्यर्थ शुभ्र संगमरवरात एक स्मारक उभारले. ज्याला ‘ताजमहाल’ म्हणून ओळखले जाते.
आग्र्याचा ताजमहाल आयुष्यात एकदा तरी पहावा आणि आपल्या जोडीदारासोबत डोळ्यासोबत साठवून घ्यावा, असे प्रत्येक प्रेमी युगलाला वाटत असेल. पण तुम्हाला माहितीये का? आपल्या महाराष्ट्रातसुद्धा प्रेमाचे प्रतिक असलेला ‘ताजमहल’ आहे. आता तो कुठे आहे? कोणी बांधला? आणि कुणासाठी बांधला? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
महाराष्ट्रातील ताजमहाल
महाराष्ट्रातील ‘ताजमहल’ हा औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर मध्ये ‘बीबी का मकबरा’ या नावाने ओळखला जातो. या सुंदर वास्तूला महाराष्ट्रातील ‘ताजमहाल’ म्हणायचे कारण म्हणजे, ही वास्तू दिल्लीतील ‘ताजमहल’ची प्रतिकृती आहे. (Bibi Ka Maqbara) याची रचना अगदी दिल्लीतील ताजमहलसारखीच आहे. यामुळे जसा दिल्लीतील ‘ताजमहल’ पहायला जगभरातून पर्यटक येत असतात तसाच महाराष्ट्रातील हा ‘मिनी ताज’ पहायलासुद्धा दररोज पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. ‘बीबी का मकबरा’ या वास्तूला सन्मानाने मराठवाड्याचा ताजमहाल असे म्हणतात.
३४५ वर्ष जुनी ऐतिहासिक वास्तू
इतिहास संशोधकांच्या अभ्यासानुसार, औरंगाबादमधील मिनी ताज अर्थात ‘बीबी का मकबरा’ (Bibi Ka Maqbara) ही वास्तू सुमारे ३४५ वर्ष जुनी ऐतिहासिक वास्तू आहे. इसवी सन १६७९ मध्ये ही वास्तू उभारण्यात आली आहे. अत उल्ला या कुशल कारागिराने ‘बीबी का मकबरा’ या वास्तूचे बांधकाम केले आहे. त्यावेळी या मकबऱ्याच्या उभारणीसाठी जयपूरमधून संगमरवरी दगड आणण्यात आले होते. ज्यासाठी एकावेळी १५० हुन अधिक वाहनांचा वापर करावा लागला होता. या वास्तूभोवती एक भव्य बाग आहे आणि तिच्या बर्बर मधोमध हे प्रेमाचं प्रतिक उभारण्यात आलं आहे.
हा मिनी ताज कोणाच्या प्रेमाचं प्रतिक आहे? (Bibi Ka Maqbara)
मोगल सम्राट औरंगजेबाची बेगम अर्थात पत्नी रबिया- उद- दुर्रानी उर्फ दिलरास बानो बेगमच्या स्मरणार्थ ही वास्तू उभारण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, ही वास्तू औरंगजेबाने नव्हे तर त्याचा मुलगा आजम शहाने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. या भव्य महालात राबिया दुर्रानी उर्फ दिलरास बानोची कबर आहे. दिलरासबानू बेगमचा मृत्यू मुलाला जन्म देताना झाला होता. तेव्हा बानो बेगमचा दफनविधी ज्या ठिकाणी करण्यात आला तिथेच हा ‘बीबी का मकबरा’ उभारण्यात आला आहे.
कसे जाल?
(Bibi Ka Maqbara) ‘बीबी का मकबरा’ ही सुंदर ऐतिहासिक वास्तू औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगरपासून ३ किमी अंतरावर आहे. इथे राज्य परिवहन बस वा खासगी टॅक्सी, वाहनाद्वारे जाता येतं. शिवाय या वास्तुपासून १० किमी अंतरावर औरंगाबाद चिखलठाणा विमानतळ आहे. तसेच औरंगाबाद रेल्वे स्टेशनपासून हे स्थळ ३६ किमी अंतरावर आहे. म्हणजेच स्वतःची गाडी, MSRTC बस, विमान किंवा रेल्वे असे वेगवेगळे पर्याय इथे पोहोचण्यासाठी उपलब्ध आहेत.