देशभरात डिजिटलायझेशनला प्रोत्साहन दिले जात आहे. सरकारी कामे देखील आता त्यामुळे घर बसल्या करता येणे शक्य होणार आहे. अशातच मध्य रेल्वेने सुद्धा डिजिटलायझेशन च्या दिशेने पाऊल टाकत तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्थानकांनवर QR कोड प्रणाली बसवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याच मोहिमेअंतर्गत देशातील बऱ्याच रेल्वे स्थानकांमध्ये QR कोड प्रणाली बसवण्यात आली आहे. आता पुणे स्थानकासाठी देखील QR कोड प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. मध्य रेल्वेचा हा उपक्रम प्रवाशांसाठी जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर तिकीट अनुभव देईल यात शंका नाही.
पुणे स्थनाकावर देखील या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. पुणे स्थानकावरील विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचा उद्देश QR पेमेंट प्रणालीला प्रोत्साहन देणे हा आहे. हेमंत कुमार बेहरा, विभागीय कमर्शियल मॅनेजर यांच्या देखरेखीखाली असलेल्या या मोहिमेमध्ये प्रमुख ठिकाणी बॅनर आणि पोस्टर्सचे प्रदर्शन, तसेच प्रवाशांना डिजिटल व्यवहारांच्या फायद्यांविषयी शिक्षित करण्यासाठी आकर्षक पथनाट्याचा समावेश होता. या कार्यक्रमाला प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
मध्य रेल्वेचा पुणे विभाग अखंड प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि सर्व प्रवाशांना त्यांच्या काउंटरवर तिकीट खरेदीसाठी QR कोड पेमेंट प्रणाली वापरण्यास प्रोत्साहित करते. या नवीन वैशिष्ट्यासह, भारतीय रेल्वेचे लक्ष्य गर्दी कमी करणे आणि प्रवाशांच्या एकूण सोयी वाढवण्याचे आहे.
QR कोड प्रणालीचे फायदे
- प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
- यामुळे कॅशलेस व्यवहार होणार असून सुट्या पैशांची कटकट मिटणार आहे.
- यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत.
- डिजिटल देवाण -घेवाणीमुळे व्यवहार स्पष्ट आणि सुरक्षित होणार आहेत.