हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ करेल अशी एक बातमी समोर आली आहे. सध्या लसणाच्या दरांत (Garlic Price Hike) मोठी वाढ पाहायला मिळत आहे. अनेक बाजारपेठेत लसूण 500 ते 600 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देखील लसणाचे हेच दर सुरू आहेत. म्हणजेच भारतातच नव्हे तर परदेशामध्ये देखील लसणाच्या किमती वाढले आहेत. बाजारामध्ये लसणाची आवकच कमी झाल्यामुळे लसणाच्या दरात ही वाढ झाली आहे.
लसणाचे दर का वाढले?
सध्या देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशी एपीएमसीमध्ये लसणाचे दर 600 रुपयांच्या वर गेले आहेत. परदेशात लसणाच्या दरात वाढ झाली आहे. याला कारण असे की, वेगवेगळ्या राज्यांमधून लसणाची आवक होत नसल्यामुळे बाजारपेठेत लसूण महाग मिळत आहे. परंतु 10 मार्चपर्यंत लसणाच्या किंमती घसरतील असे सांगितले जात आहे. परंतु हे दर कमी होईपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना लसूण 400 ते 500 रुपये किलो दरानेच घ्यावा लागणार आहे.
यंदाच्या वर्षी लसणाच्या उत्पादनामध्ये देखील घट झाल्यामुळे त्याचे परिणाम लसणाच्या किमतींवर दिसून येत आहेत. तर मधल्या काळात अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान भाव वाढण्यास जबाबदार आहे. परंतु काही काळात बाजारामध्ये लसणाची आवक वाढल्यानंतर भाव देखील पडतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दुसरीकडे कांदा-बटाट्याचे भाव कमी झाले आहेत. तसेच बाजारात पालेभाज्या देखील स्वस्त मिळत आहेत. मात्र एक किलो लसणाचा भाव 450 ते 500 रुपयांपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे आता ताटामध्ये लसूण पाहण्यासाठी नागरिकांना हे भाव कमी होण्याची वाट पाहावी लागणार आहे.