देशातील खासदारांच्या वेतनात मोठी वाढ; मोदी सरकारचा निर्णय

Modi government
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकारने (Central Government) सोमवारी देशातील खासदारांच्या वेतनात मोठी वाढ जाहीर केली आहे. नव्या निर्णयानुसार, १ एप्रिल २०२५ पासून खासदारांचे मासिक वेतन १ लाख रुपयांवरून १.२४ लाख रुपये करण्यात आले आहे. तसेच पेन्शन आणि भत्त्यातही सुधारणा करण्यात आली आहे.

पेन्शन आणि भत्त्यांमध्येही वाढ

नुकतीच निवृत्त खासदारांसाठी पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे. आधी २५,००० रुपये मिळणाऱ्या खासदारांना आता ३१,००० रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे, दोन किंवा अधिक वेळा खासदार राहिलेल्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी २,००० रुपये मिळणारे हे अतिरिक्त पेन्शन आता २,५०० रुपये करण्यात आले आहे.

खासदारांना मिळणाऱ्या इतर सुविधा

खासदारांना केवळ वेतन आणि पेन्शनच नाही, तर विविध प्रकारचे भत्ते आणि सुविधा मिळतात. यामध्ये संसदेच्या अधिवेशनादरम्यान मिळणारा दैनिक भत्ता २,००० रुपयांवरून २,५०० रुपये करण्यात आला आहे. तसेच, खासदारांना त्यांच्या मतदारसंघात कार्यालय चालवण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी ७०,००० रुपये भत्ता मिळतो, तर कार्यालयीन खर्चासाठी दरमहा ६०,००० रुपये दिले जातात.

खासदारांना मिळणाऱ्या सुविधा

विनामूल्य हवाई आणि रेल्वे प्रवास: खासदारांना वर्षातून ३४ वेळा मोफत हवाई प्रवास करता येतो, तसेच ते पहिल्या श्रेणीत मोफत रेल्वे प्रवास करू शकतात.

घर आणि वीज पाणी मोफत: दिल्लीतील निवासासाठी खासदारांना सरकारकडून मोफत घर दिले जाते. त्यांना ५०,००० युनिट वीज आणि ४,००० किलोलिटर पाणीही विनामूल्य दिले जाते.

इंधन भत्ता: खासदारांना त्यांच्या प्रवासासाठी इंधन भत्ताही मिळतो.

मोफत इंटरनेट आणि फोन सेवा: खासदारांना दूरसंचार आणि इंटरनेट सुविधेसाठी वार्षिक भत्ता दिला जातो.

दरम्यान, यापूर्वी २०१८ मध्ये वेतनात सुधारणा करण्यात आली होती. तेव्हा खासदारांचे मूलभूत वेतन १ लाख रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आले होते. वाढत्या महागाईचा विचार करून, सहा वर्षांनंतर पुन्हा वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे