मोठी बातमी! अखेर सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच झाल्याचे स्पष्ट

Somnath Suryavanshi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| परभणीच्या (Parbhani) नवामोंढा पोलीस ठाण्यात कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांचा मृत्यू झाला होता. आता या मृत्यू प्रकरणीच एक मोठा खुलासा झाला आहे. राज्य मानवाधिकार आयोगासमोर (State Human Rights Commission) सादर झालेल्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नव्हे, तर पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

पोलीस कोठडीतच अमानुष मारहाण

सोमनाथ सूर्यवंशी यांना 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. प्रशासनाने हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला होता. परंतु शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याचे समोर आले होते. या अहवालानंतर सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचे पुरावे मिळाले.

मानवाधिकार आयोगाची गंभीर दखल

न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत पोलिसांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात सूर्यवंशी यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा निष्कर्ष या अहवालातून स्पष्ट झाला आहे. हा अहवाल मानवाधिकार आयोगासमोर सादर होताच, आयोगाने तातडीने संबंधित पोलिसांना नोटिसा बजावल्या आणि त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे.

दोषींवर अद्याप ठोस कारवाई नाही

या धक्कादायक अहवालानंतर राज्य सरकारवर मोठा दबाव वाढला आहे. तर दुसऱ्या बाजूला मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे., “आम्हाला सरकारची मदत नको, पण न्याय हवा,” अशी ठाम भूमिका त्यांची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी घेतली आहे.

धकादायक म्हणजे, या प्रकरणाच्या सुरुवातीला पोलिसांनी घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर तब्बल २ महिन्यांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह २ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आता न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर या प्रकरणात अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणांमध्ये राज्य सरकारने अद्याप कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यावर ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. तसेच सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसोबत विरोधकांनी लावून धरली आहे.