Bill Gates Donation : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जागतिक स्तरावर ओळखले जाणारे तंत्रज्ञान उद्योजक बिल गेट्स यांनी इतिहासातील सर्वात मोठं दान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी तब्बल 200 अब्ज डॉलर्स (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 16.6 लाख कोटी रुपये) इतकी संपत्ती बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला देण्याचं जाहीर केलं आहे. हे दान केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरातील धर्मादाय (Bill Gates Donation) क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
दानाचे ऐतिहासिक महत्त्व (Bill Gates Donation)
गेट्स यांची ही देणगी याआधीच्या कोणत्याही उद्योगपतींच्या धर्मादाय देणग्यांपेक्षा मोठी आहे. जॉन डी. रॉकफेलर आणि अँड्र्यू कार्नेगी यांच्या ऐतिहासिक योगदानालाही ही रक्कम मागे टाकते. विशेष म्हणजे, बिल गेट्स यांचे मित्र आणि बर्कशायर हॅथवेचे गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनीही मोठ्या प्रमाणात देणगी दिली असून त्यांनी वचन दिलेल्या संपत्तीचे सध्याचे मूल्य सुमारे 160 अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, गेट्स यांचे 200 अब्ज डॉलर्सचे योगदान हे एक नवीन विक्रम ठरते.
- गेट्स फाऊंडेशनचं कार्यक्षेत्र
बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन ही जगातील सर्वात मोठी खासगी धर्मादाय संस्था (Bill Gates Donation) असून, तिची स्थापना 2000 साली झाली. गेट्स आणि त्यांची माजी पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी या संस्थेच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलन, सार्वजनिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण, आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर मोठं योगदान दिलं आहे.
भारतामधील योगदान
गेट्स फाऊंडेशन भारतातही ग्रामीण भागातील गरीब, गरजू आणि आजारी लोकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि शेतीसारख्या क्षेत्रात कार्यरत आहे. पोलिओ निर्मूलन मोहिम, स्वच्छतेचे कार्यक्रम आणि महिलांसाठी आरोग्य सेवा वाढविण्यासाठी या संस्थेने विशेष प्रयत्न केले आहेत.
पुढील 20 वर्षांचं नियोजन
या भव्य देणगीमुळे गेट्स फाऊंडेशनच्या आर्थिक क्षमतेत मोठी भर पडणार असून, पुढील 20 वर्षांमध्ये ही संस्था 200 अब्ज डॉलर्स इतकी रक्कम विविध सामाजिक उपक्रमांवर खर्च करू शकेल. हे निधी आरोग्य सेवेत संशोधन, लसीकरण, हवामान बदलाचा सामना, आणि शिक्षण प्रणालीत नवकल्पनांसाठी वापरले जाणार आहेत.




