भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल!! जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आता भाजपने देखील आपली कंबर कसत निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. भाजपकडून राज्यातील जिल्हाध्यक्षांची नवी टीम उभी करण्यात आली आहे. भाजपने काही प्रमुख जिल्ह्यात जिल्हा अध्यक्षांची निवड केली असून याबाबतची माहिती महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

भाजप महाराष्ट्र ट्विटर अकाऊंटवरुन ही नवीन जिल्हाध्यक्षांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप अंतर्गत पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करेल अशी चर्चा रंगली होती. मात्र भाजपकडून या संबंधित कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यानंतर अखेर राज्यातील संघटन बांधणीच्या दृष्टीने भाजपने नवीन जिल्हाध्यक्षांची निवड केली आहे.

त्यानुसार नागपूर शहरांमध्ये भाजप शहराध्यक्षपदी बंटी कुकडे यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हाध्यक्ष पदासाठी सुधाकर कोहळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे राष्ट्रवादीचे वर्चस्व असणाऱ्या बारामतीत भाजपचे नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून वासुदेव काळे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणे शहरासाठी धीरज घाटे यांचे नियुक्ती केली गेली आहे. पुणे (मावळ) साठी शंकर बुट्टे पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला नमवण्यासाठी देशातील 26 विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. काल या संबंधित बंगळूर येथे महत्त्वाची बैठक पार पडली असून यामध्ये या विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया असे नाव देण्याचे घोषित करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये, महाराष्ट्राचे शिवसेना नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा देखील समावेश होता. “इंडिया” आघाडीही आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला हरविण्यासाठी उभी करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपला आगामी निवडणुकीमध्ये या 26 पक्षांना सामोरे जावे लागणार आहे. त्याचबरोबर, निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आपली पक्की रणनीती आखावी लागणार आहे.