शिवरायांबद्दलच्या एकेरी उल्लेखानंतर रावसाहेब दानवेंकडून स्पष्टीकरण; म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली जात आहे. काल भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात असल्याने अखेर दानवेंनी माफी मागितली आहे. “सध्या समोर आलेला व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्या विधानाबाबत मी संपूर्ण देशाची माफी मागितली होती. मी सध्या शिवरायांबद्दल असे कोणतेही विधान केलेले नाही, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले आहे.

रावसाहेब दानवे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल काही माध्यमांनी मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना एकेरी भाषेचा वापर केला, असे वृत्त दिले आहे. मात्र, या दोन वर्षांमध्ये मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दोन वर्षांपूर्वी मी नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी तेथील पत्रकारांनी मला राज्यपालांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी मी अनावधानाने शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांमध्ये उल्लेख केला.

मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलल्यानंतर तेव्हा माझ्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर मी तेव्हा समस्त देशवासीयांची माफी मागितली होती. तो व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. मात्र, सध्या हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला आहे. मी ते वक्तव्य काल किंवा आज केल्यासारखे दाखवण्यात येत आहे. माझ्या त्या विधानाची मी तेव्हाच माफी मागितली होती. आताही पुन्हा एकदा मी जनतेची माफी मागतो, असे दानवे यांनी म्हंटले.