व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिंदे गटातील नेत्याच्या हॉटेलवर भाजप नेत्याच्या मुलाची दगडफेक; 50 जणांविरोधात गुन्हा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-भाजपचे सरकार आहे. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम पाहत आहेत. मात्र, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये मात्र, काहींना काही कारणांनी वाद होत आहेत. याचे कारण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये नुकतीच राड्याची घटना घडली. यावेळी शिंदे गटातील नेत्याच्या हॉटेलवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी भाजप नेत्याच्या मुलासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगरमधील केडगाव परिसरात भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या पुत्र आणि शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सातपुते यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. यामध्ये कर्डिले यांच्या मुलाने शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांच्या हॉटेलची तोडफोड केली. यानंतर दिलीप सातपुते यांचे बंधू विठ्ठल सातपुते यांनी कर्डिले यांच्या मुलासह 50 ते 60 जणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं घडलं काय?

एका लग्न समारंभात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले याचा सातपुते यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादात कर्डिले यांच्या मुलाने कार्यकर्त्यांना घेऊन सातपुते यांच्या मालकीच्या रंगोली हॉटेवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत हॉटेलसह परिसरातील काही वाहनांचे देखील नुकसान झाले. याप्रकरणी दिलीप सातपुते यांचे बंधू विठ्ठल सातपुते यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. तक्रार दाखल होताच, पोलिसांनी कर्डिले यांच्या मुलासह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केला.