Saturday, June 3, 2023

केजरीवालांकडे फक्त पोल्यूशन, सोल्यूशन नाही; भाजप नेत्यांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने काल गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच दिल्लीचे मुख्यमंत्री तथा ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुजरात बांधवांशी गुजराती भाषेत संवाद साधला. मात्र, आता भाजप नेत्यांनीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी दिल्लीतील प्रदूषणावरून केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे फक्त पोल्यूशन आहे, सोल्यूशन नाही, म्हणत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी ‘आप’वर टीका केली आहे.

संबित पात्रा आणि मनोज तिवारी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी संबित पात्रा म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत. दिल्ली भ्रष्टाच्या प्रदुषणाचा सामना करत आहे. दिल्लीच्या बांधकाम कामगारांसाठी काम करणाऱ्या तीन गैर सरकारी संघटनांनी दिल्लीतील कामगारांच्या नोंदणीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. तसेच तपासातही दिल्लीत 2 लाख बनावट कामगारांची नोंद झाल्याचा आरोप पात्रा यांनी केला.

एकंदरीत भाजप नेत्यांकडून गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. केजरीवाल यांना अडचणीत आणण्यासाठी भाजप नेत्यांनी दिल्लीतील दूषित हवामानाचा मुद्दा उचलला आहे.