भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश? जळगावातून तिकिट मिळण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भाजपने जळगाव मतदारसंघांमध्ये खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याचे म्हटले जात आहे. अशातच आज उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना आणखीन उधाण आले आहे. यासह उद्या उन्मेष पाटील शिवसेनेत प्रवेश करतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास पाटील यांना शिवसेना जळगाव मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकते.

आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत, उन्मेष पाटील, करण पवार आणि संपर्कप्रमुख संजय सावंत यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जळगावमधून उन्मेष पाटील किंवा करण पवार यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप खासदार उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासह नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली, हे समोर आलेले नाही. याबाबत कोणत्याही शिवसेनेच्या नेत्यांकडून खुलासाही करण्यात आलेला नाही.

मुख्य म्हणजे भाजपकडून जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे भाजपला रामराम ठोकत उन्मेष पाटील शिवसेनेत दाखल होतील असे म्हटले जात आहे. या संदर्भातच त्यांनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. उद्या उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यास त्यांना जळगावातून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या प्रत्यक्षात पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर लोकसभा निवडणूक उन्मेष पाटील विरोध स्मिता वाघ असा सामना पाहिला मिळू शकतो.