मलकापुरात भाजपाचे खड्ड्यात झाडे लावून आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मलकापूर शहरात नाविण्यपुर्ण योजना राबवल्या जात असल्याचा दावा सत्ताधारी गटाकडून कायम होतो. मात्र सध्या मलकापूर नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारातच खड्ड्यांची संख्या वाढू लागल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात वारंवार संबधित अधिकारी, सत्ताधारी पदाधिकारी यांच्याकडे सुचना करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवकांसह भाजपा पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यात झाडे लावत अनोखे आंदोलन केले. अनोखे आंदोलन करून सत्ताधारी गटाला जाग आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

यावेळी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अजित थोरात, गटनेत्या नुरजहॉं मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते राजू मुल्ला, नगरसेवक दिनेश रैनाक, भास्कर सोळवंडे, भाजपा महिला आघाडीच्या सारिका गावडे, आण्णा काशिद, बेले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मलकापूर फाटा ते लक्ष्मीनगर हा कायम वर्दळीचा रस्ता आहे. मलकापूूर फाटा ओलांडून मलकापुरात येताना किंवा बाहेर जाताना मुळातच वाहतुक कोंडीने वाहनधारक, पादचारी, शालेय विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. यातच आता मलकापूर फाटा परिसरात खड्ड्यांची संख्या वाढली आहे. खड्ड्यांची खोली वाढल्याने पावसाळ्यात वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू मुल्ला यांनी आवाज उठवत नगरपरिषदेच्या संबंधित अधिकारी यांना वारंवार खड्डे बुजवण्याबाबत सांगितले. मात्र संबधित अधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

राजू मुल्ला यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ः- रस्त्यावर खड्ड्याबाबत राजू मुल्ला यांनी आक्रमक होत मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. या निवेदनावर राजू मुल्ला म्हणाले, खड्ड्यांची खोली वाढत निघाली आहे. त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना शाळकरी मुलांना अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनधारकास मोठा दणका बसतो. मलकापूर फाटा हे मुख्य प्रवेशद्वार आहे. येथील अवस्था दुर्दैवी असून याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू मुल्ला यांनी दिला आहे.