भाजपचा ‘आप’चे आमदार फोडण्याचा प्रयत्न, प्रत्येकाला 25 कोटींची ऑफर; केजरीवाल यांचा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी भाजपावर गंभीर आरोप लावले आहेत. “भाजप पक्ष आपचे सात आमदार खरेदी करू पाहत आहेत. यासाठीच त्यांनी प्रत्येकी एका आमदारांना तब्बल 25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.” असा मोठा गौप्यस्फोट अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. याबाबत त्यांनी X वर पोस्ट केली आहे. त्यामुळे सध्या राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आपल्या पोस्टमध्ये अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, अलीकडेच भाजपने आमच्या 7 आमदारांशी संपर्क साधला आणि सांगितले की “आम्ही केजरीवाल यांना काही दिवसांनी अटक करणार आहोत. त्यानंतर आम्ही आमदार फोडू. आता पर्यंत 21 आमदारांशी चर्चा झाली आहे. इतरांशीही बोलत आहोत. त्यानंतर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडू. तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला २५ कोटी रुपये देऊ, भाजकडून तिकीट देऊ”

त्याचबरोबर, “त्यांनी 21 आमदारांशी संपर्क साधल्याचा दावा केला असला तरी आमच्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत फक्त 7 आमदारांशी संपर्क साधला असून या सर्वांनी नकार दिला आहे. याचाच अर्थ कोणत्याही दारू घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मला अटक केली जात नसून दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्याचा त्यांचा डाव आहे. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी आमचे सरकार पाडण्यासाठी अनेक कट रचले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. देव आणि लोकांनी आम्हाला नेहमीच साथ दिली. आमचे सर्व आमदारही भक्कमपणे एकत्र आहोत” असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.

पुढे बोलताना, “आमच्या सरकारने दिल्लीतील जनतेसाठी किती काम केले हे या लोकांना माहीत आहे. त्यांनी निर्माण केलेल्या सर्व अडथळ्यांना न जुमानता आम्ही खूप काही साध्य केले आहे. दिल्लीतील लोकांचे ‘आप’ वर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे निवडणुकीत ‘आप’चा पराभव करणे त्यांच्या अखत्यारीत नाही. त्यामुळे त्यांना मला बनावट दारू घोटाळ्याच्या निमित्ताने अटक करून सरकार पाडायचे आहे” असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दरम्यान, मद्य घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवाल चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांना सक्तवसुली संचालनालयाने अनेक वेळा नोटीस पाठवत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, येत्या काळात या प्रकरणामुळे अरविंद केजरीवाल यांना अटक केली, जाऊ शकते असे देखील म्हटले जात आहे.