मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपचा मेगाप्लॅन; उर्दूत प्रचार करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Lok Sabha Election 2024) तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी नवनवीन आश्वासने देण्यात येत आहेत. याच पार्शवभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) देशातील मुस्लिम मतदारांना (Muslim Voters) आकर्षित करण्यासाठी मेगा प्लॅन आखला आहे. त्यानुसार भाजप कार्यकर्ते मशिदीत आणि मदरशात जाऊन पक्षाचा प्रचार करणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे उर्दू आणि अरबी भाषेत हा प्रचार करण्यात येईल.

आजपासून मुस्लिमांबाबत आपल्या नव्या प्रचाराला सुरुवात करण्यात येणार आहे. हि मोहीम उत्तर प्रदेशात राबवली जात आहे. यासाठी भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधल्या लखनऊ येथील दर्गाह हजरत कासिम शाहीद येथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या भागात ‘फिर एक बार मोदी सरकार अशी बॅनरबाजी उर्दूमध्ये लावण्यात येणार आहेत. मुस्लिम समाजामध्ये उर्दू साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीच हा सर्व खटाटोप सुरु आहे.

या अभियानामुळे मुस्लिम समाजात भाजपची पोहोच वाढेल, तसंच मोदी सरकारच्या योजनांची माहिती त्यांना सोप्प्या शब्दात समजेल असं पक्षाला वाटतंय. भाजपच्या या नव्या मोहिमेबाबत अल्पसंख्याक मोर्चाचे म्हणणे आहे की, केंद्र सरकार ज्या प्रकारे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वासाचा नारा देत आहे, त्याला मुस्लिम समाजाचाही पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच आता अरबी आणि उर्दूमध्येही पक्षाचा संदेश पोचवण्यात येणार आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांना ते समजू शकेल त्यावर ते आपलं मत व्यक्त करतील.